ना मुक्ता टिळक ना हेमंत रासने ; कसब्यासाठी बापटांची तिसऱ्यालाचं पसंती ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:34 PM2019-09-20T16:34:31+5:302019-09-20T16:36:23+5:30
मी कायम कार्यकर्त्यांना महत्व दिले आहे. मागील तीस वर्षात हमालीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपासून अनेकांना नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे कसब्यातूनही कार्यकर्त्याच्या नावालाच पसंती असेल असे विधान खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले आहे.
पुणे : मी कायम कार्यकर्त्यांना महत्व दिले आहे. मागील तीस वर्षात हमालीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपासून अनेकांना नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे कसब्यातूनही कार्यकर्त्याच्या नावालाच पसंती असेल असे विधान खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले आहे.
शहरातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीविषयी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले. कसबा विधानसभा मतदारसंघातून बापट यांनी पाच वेळा आमदार म्ह्णून प्रतिनीधित्व केले आहे. बापट लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्या मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेवक हेमंत रासने यांच्यासह इच्छुकांची मोठी संख्या आहे. अशावेळी बापट यांचा शब्द महत्वाचा ठरणार आहे. अखेर त्यांनी याविषयावर मत व्यक्त केले असून त्यांनी कोणत्याही विद्यामान पदाधिकाऱ्याचे किंवा नगरसेवकाचे नाव न घेता कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे इच्छुकांच्या पोटात गोळा येणार असून काहींच्या आशाही पल्लवित होऊ शकतात.
याबाबत ते म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना न्याय देणारा माणूस आहे. सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जे नाव असेल तेच सांगितले जाईल. मी म्हणेल ते खरं म्हणण्यापेक्षा खरं तेच मी म्हणेन असा प्रयत्न असेन. तिकीट देण्याचा निर्णय प्रदेश कार्यकारिणी घेणार असून विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल की नाही याबाबतही तेच निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.