Tasty Katta : ना तिखट, ना तळलेले; पाण्याच्या वाफेवर काही मिनिटात तयार मोमोज खाण्याची मजाच वेगळी
By राजू इनामदार | Published: September 25, 2022 03:05 PM2022-09-25T15:05:51+5:302022-09-25T15:06:01+5:30
मोमोज हा खरोखरच रस्त्यावर उभ्या उभ्या तयार करण्याचा व तसाच उभ्या उभ्या खाण्याचा पदार्थ
पुणे : मोमोज हा खरोखरच रस्त्यावर उभ्या उभ्या तयार करण्याचा व तसाच उभ्या उभ्या खाण्याचा पदार्थ आहे. त्याला ना तिखट, ना तळण. तयार करून एखाद्या पात्रात पाण्याच्या वाफेवर काही मिनिटे ठेवला की तो तयार होतो. बसून खाण्यासाठी आता त्याची खास ठिकाणे झाली आहे हे खरे असले तरी तो खायचा तर असाच रस्त्यावर उभे राहूनच.
इतिहास
मोमोजचे मूळ सापडते तिबेटमध्ये. नेपाळ व तिकडच्या काही शहरांमध्ये. नंतर तो जगभर फिरला व त्यात त्यात्या देशांप्रमाणे, तेथील नागरिकांच्या आवडीप्रमाणे बदल होत गेले. मात्र मूळ प्रक्रिया आहे तीच राहिली. वाफेवर तयार करण्याच्या त्याच्या कृतीत फारसा बदल झाला नाही.
पूर्वतयारी
वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मैदा व नेहमीची मीठ, पीठ, लसूण पेस्ट वगैरे सामग्री असली की पुरेसे होते. आधी मैद्यात थोडे पाणी, मीठ टाकून चांगले मळून मऊ पीठ तयार करायचे. त्यानंतर ज्या भाज्या आहेत त्या अगदी थोड्याशा तेलावर तव्यात परतून घ्यायच्या. किसलेल्या कोबीपासून ते ढोबळी मिरचीच्या बारीक तुकड्यापर्यंत काहीही चालते. चवीला म्हणून गाजर, बीट टाकले तरीही. हे सगळे नीट परतून घ्यायचे. परतून घेत असतानाच त्यात मीठ व मसाल्याचे आणखी काही पदार्थ हवे असतील तर टाकायचे.
प्रत्यक्ष कृती
पीठाच्या पुऱ्या करायच्या, त्यात हे सारण भरायचे व मग हवे मोदक, फक्त गोल किंवा करंजी अशा कोणत्याही आकारात बंद करून टाकायचे. पुरीच्या कडा बंद करण्यासाठी थोडा पाण्याचा हात लावला तरी भागते. त्यानंतर दोन पात्र असलेले भांडे. ते यात सर्वात महत्त्वाचे. खालील भागात पाणी, त्यावर छिद्र असलेले दुसरे भांडे व त्यावर झाकण, छिद्र असलेल्या भांड्यात ठेवून द्यायचे. पंधरा ती वीस मिनिटांनी काढून घ्यायचे. झाले मोमोज तयार
चवीला भन्नाट
शेजवान किंवा अन्य कोणत्याही चटणीबरोबर हे मोमोज एकदम चवदार लागतात. भाज्यांची चव जिभेला रसदार बनवते व पोटालाही आराम देते. आता काही कल्पक तरुणांनी पनीर मोमोज, कॉफी विथ मोमोज, फ्राय मोमोज, तंदूर मोमोज असे बरेच प्रकार यात आणले आहेत. सौरभ मुळीक या ३२ वर्षांच्या युवकाची ५ स्वत:ची व ४ त्यानेच दिलेल्या फ्रँचाईज अशी ९ दुकाने पुण्यात आहेत. त्याशिवाय बागेसमोर, खाऊ गल्लीत कुठेही अगदी साध्या स्टुलावर वाफेचे पात्र घेऊन बसलेले विक्रेतेही दिसतात.