Pune Crime: पुतणीवर बलात्कार, गोळ्या खाऊ घालून गर्भपात; ‘काका’वर पोक्सो
By नितीश गोवंडे | Published: February 5, 2024 01:33 PM2024-02-05T13:33:26+5:302024-02-05T13:34:04+5:30
हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पीडित मुलीच्या लोहगाव येथील घरात घडला आहे....
पुणे : शहरात काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर चुलत काकाने बलात्कार केला. तसेच ती गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पीडित मुलीच्या लोहगाव येथील घरात घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून काकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा चुलत दीर आहे. आरोपीने फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा प्रकार घरच्यांना माहीत झाल्यावर त्याला समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील त्याने मुलीसोबत संपर्क ठेवला. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चौधरी या करत आहेत.