मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:54 IST2022-04-28T16:54:42+5:302022-04-28T16:54:57+5:30
पुण्यातील मुक्कामात ते औरंगाबादमधील जाहीर सभा, ३ मे च्या महाआरतीचे नियोजन व ५ जूनचा अयोध्येचा दौरा याबाबत मनसेतील नेत्यांबरोबर चर्चा करतील

मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या
पुणे : भोंग्यावरून सरकारला इशारा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी (दि. २९) पुण्यात येत आहे. १ मे ला जाहीर केलेल्या औरंगाबादमधील सभेसाठी शनिवारीच ते पुण्यातून निघणार आहेत. दरम्यान पुण्यातील मुक्कामात ते औरंगाबादमधील जाहीर सभा, ३ मे च्या महाआरतीचे नियोजन व ५ जूनचा अयोध्येचा दौरा याबाबत मनसेतील नेत्यांबरोबर चर्चा करतील असे समजते.
अयोध्येमध्ये पुण्यातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जावेत असे अपेक्षित आहे. त्याचे नियोजन करण्यात येईल. गुढीपाडव्याच्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मशिंदीवरील भोंगे काढण्याबाबत इशारा देऊन ठाकरे यांनी महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडवून दिला. त्यानंतर पुन्हा पुण्यात त्यांनी हनुमान जयंतीच्या मुहर्तावर महाआरती केली व अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सर्व मंदिरात महाआरती करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला. या सर्व गदारोळात त्यांनी औरंगाबादला १ मे रोजी सायंकाळी जाहीर सभाही आयोजित केली आहे. ५ जूनला अयोध्येत जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
महाआरतीसाठी ग्रीन सिग्नल
या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच ठाकरे पुण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिस चिंतीत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी त्यांच्याकडून काळजी घेण्यात येत आहे. ठाकरे पुण्यात मुक्काम करणार आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी स्थानिक नेत्यांबरोबर बैठक आयोजित केली असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये ते ३ मे च्या महाआरतीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेणार आहेत. तसेच ५ जूनच्या अयोध्या दौऱ्यात तिथे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना काही अडचणी आहेत का याचीही विचारणा ते करतील अशी माहिती मिळाली आहे. पुण्यातील स्थानिक नेत्यांनी अक्षय तृतीयेला करावयाच्या महाआरती संदर्भात शहरातील काही प्रमुख मंदिर व्यवस्थापनांबरोबपर संपर्क साधला असल्याचे समजते. व्यवस्थापनांनी त्यांना महाआरतीसाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती मिळाली.