नामांकित कंपनीत पावणेचार कोटींचा अपहार करणारा जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:18+5:302021-08-29T04:14:18+5:30
पुणे : कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून ३ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली ...
पुणे : कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून ३ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आदित्य राजेश लोंढे (वय २८, रा. शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे.
डब्ल्यूएनएन कंपनीमध्ये २०१८ ते २०२० दरम्यान आदित्य लोंढे व त्याच्या साथीदारांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन व कंपनीचे लॉगिन आयडीचा गैरवापर करून इंटरनेट व संगणकाद्वारे कंपनीमधून ३ कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून लोंढे हा फरार होता.
खंडणीविरोधी पथकातील पोलीस अंमलदार रमेश चौधर व अमर पवार हे गस्त घालत असताना त्यांना आदित्य लोंढे हा जंगली महाराज रोडवरील जे. एम. कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आदित्य लोंढे याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला सायबर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.