आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:51+5:302021-03-22T04:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे, पुणे शहर भाजपाच्या वतीने पाटील व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक चौकात रविवारी आंदोलन करण्यात आले.
परमबीर सिंहाच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर नीतिमत्तेची थोडीशी का होईना, पण चाड शिल्लक असेल तर त्यांनी अनिल देशमुखांचा तत्काळ राजीनामा लगेच घेतला पाहिजे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटिलिया प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला नसता तर हा विषय दाबला गेला असता. त्यांनी आक्रमकपणे हा विषय लावून धरल्यामुळे सचिन वाझेवर कारवाई होऊ शकली. वाझेला तुम्ही सेवेत सामावून घेतल्यानंतर तो खंडणी वसूल करण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता. तर अनिल देशमुख सभागृहात कशाच्या आधारावर सचिन वाझेचा बचाव करत होते, याचं त्यांनी उत्तर द्यावं, असे आवाहन पाटील यांनी केले.
राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सामान्य नागरिकांना मारहाण करतात, धमकी देतात, मंत्री महिलांशी गैरकृत्य करतात, पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करतात, कोरोनाकाळात यांनी मोठा भ्रष्टाचार केला, हे सरकार नसून खंडणी गोळा करणारी भ्रष्ट गुंडांची टोळी असल्याचा आरोप यावेळी जगदीश मुळीक यांनी केला.
आंदोलनात सुनील कर्जतकर, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक पोटे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, महिला शहराध्यक्ष अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे पुणे शहर भाजपाच्या वतीने लोकमान्य टिळक चौकात रविवारी आंदोलन करण्यात आले.