प्रचारात बचत गटांचे नेटवर्क
By admin | Published: February 18, 2017 03:36 AM2017-02-18T03:36:36+5:302017-02-18T03:36:36+5:30
महापालिका निवडणुकीतील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारसभा, पदयात्रा किंवा पक्षांच्या सभांमध्ये गर्दीत कधीकुठे
पुणे : महापालिका निवडणुकीतील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारसभा, पदयात्रा किंवा पक्षांच्या सभांमध्ये गर्दीत कधीकुठे काही सारखे चेहरे दिसले तर गांगरून जाऊ नका, ते कदाचित बचत गटातील महिलांचे किंवा पुरुषांचेही असतील. प्रचाराला गर्दी दिसावी, त्यातून मतदार आकर्षिक व्हावा यासाठी उमेदवारांकडून बचत गटांच्या नेटवर्कचा नियोजनबद्ध वापर केला जात आहे. पैसे देऊन गर्दी जमविण्याचा हा फंडा बऱ्याच उमेदवारांकडून वापरला जात आहे. त्यातून बचत गटातील महिलांना रोजगार मिळत असून, त्यामुळे त्यांच्यात खुशीचे वातावरण आहे.
महिला बचत गटांचा यासाठी प्राधान्याने वापर होत आहे. काही ठिकाणी पुरुषांचेही गट असून, त्यांच्याशीही संपर्क साधला जात आहे. काही राजकीय नेत्यांचेच त्यांच्या परिसरात त्यांच्याच प्रयत्नाने सुरू झालेले महिला बचत गट असून, त्यातील महिलांनाही प्रचारात उतरवले जात आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाकडून महापालिका हद्दीत १२ हजारपेक्षा जास्त महिला बचत गट नोंदवण्यात आले आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत किमान ७०० ते ८०० बचत गट आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम, योजना राबवल्या जातात. या बचत गटांमधील महिलांचा उमेदवारांकडून प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्यासाठी त्यांना मानधन दिले जाते. प्रत्येक महिलेला दिवसभरासाठी ५०० रुपये व फक्त दुपारपर्यंतसाठी ३०० रुपये दिले जातात, अशी माहिती मिळाली. गटातील प्रमुख महिलेला सायंकाळीच दुसऱ्या दिवशीचा उमेदवाराचा कार्यक्रम दिला जातो. कुठे, किती वाजता उपस्थित राहायचे, याची माहिती दिली जाते. त्याप्रमाणे सकाळी पदयात्रेत मतदारांच्या भेटीगाठी घेताना, सायंकाळी प्रचारसभेत यातून गर्दी केली जात आहे. कार्यक्रम संपल्यानंतर रोख पैसे दिले जातात. काही उमेदवारांकडून चहा, नाष्ट्याचीही व्यवस्था केली जाते. (प्रतिनिधी)
पक्षाचे झेंडे, पत्रके, अहवाल असे प्रचारसाहित्यही या महिलांकडे मतदारांना वाटपासाठी दिले जाते. मोठी प्रचारफेरी असेल तर तिचा मतदारांवर प्रभावही चांगला पडतो.
बरेच कार्यकर्ते मागे आहेत, असे चित्र उभे राहते. त्यामुळे बऱ्याच उमेदवारांनी हा फंडा वापरण्यात सुरुवात केली आहे.
जाहीर प्रचाराचे दिवस कमी होऊ लागल्याने बहुसंख्य उमेदवारांनी आता प्रभागातून फेऱ्या काढण्यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. अशा फेऱ्यांसाठी गर्दी लागते. ती गर्दी बचत गटांच्या माध्यमातून जमा केली जात आहे.
पक्षाच्या नेत्यांच्या सभांना कमी गर्दी झाली की त्याचा परिणाम मतदारांवर होतो, अशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. येत्या चार-पाच दिवसांंत शहरात अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
४सर्वसामान्य मतदारांकडून या सभांना गर्दी केली जाते, मात्र ते प्रमाण कमीच असते. त्यामुळे अशा वेळी त्या त्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उमेदवारांना गर्दी जमा करण्यास सांगतात. बचत गटांममुळे आता उमेदवारांना गर्दी जमवणे सोपे झाले आहे. बचत गटांच्या प्रमुख महिला याविषयी उघडपणे बोलत नाहीत, मात्र निवडणुकीमुळे त्यांच्यामध्ये खुशीचे वातावरण आहे.