'मावळ मतदारसंघातून लोकसभा लढविण्याचा कधीही विचार केला नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 09:23 AM2019-03-05T09:23:02+5:302019-03-05T09:36:21+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत मला पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाली होती.
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मावळलोकसभा मतदारसंघातून आर. आर. आबा यांच्या कन्या स्मिता पाटील-थोरात यांचे नाव चर्चिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात या नावावरुन सोमवारपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, मी कधीही मावळमधून निवडणूक लढविण्याचा विचार केला नसल्याचं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी या चर्चेला अल्पविराम मिळाला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत मला पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून विचारणा झाली होती. पण, मी या मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा कधीही विचार केला नाही. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार जो आदेश देतील तो मला मान्य आहे, असे म्हणत स्मिता पाटील यांनी गरज पडल्यास मागे हटणार नसल्याचेही स्पष्ट केलंय. मी या चर्चेवर कुठलेही मत मांडू इच्छित नाही. कारण, मावळ मतदारसंघाबाबत शरद पवारच अंतिम निर्णय घेतील, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
आघाडीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला आला आहे. सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार माजी महापौर आझम पानसरे व राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘राष्ट्रवादी’ची ताकत असूनही अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची खेळी सुरू केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. पण, खुद्द शरद पवार यांनी सुप्रिया आणि माझ्याशिवाय पवार घरातील कुणीही लोकसभा लढवणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, पार्थच काय, कोणीही पवार माझ्या विरोधात लढण्यास आले, तरी मला फरक पडणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात माझा जनसंपर्क चांगला आहे. मला ओळख निर्माण करण्यासाठी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही, अशी टीका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली होती. मात्र, आता आर.आर. पाटील यांच्या कन्येचं नाव पुढे आले आहे. त्यामुळे, विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना पाटीलकन्येचे आव्हान ठरेल का? हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.