पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधार योजनेत नवीन 3 घाट; सुमारे पावणे 5 हजार कोटींचा खर्च करण्यात येणार
By निलेश राऊत | Published: May 5, 2023 05:05 PM2023-05-05T17:05:16+5:302023-05-05T17:05:23+5:30
नदी सुधार प्रकल्प पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आला असून, ४४ कि.मी. अंतराचा नदी काठ सुशोभित करताना ११ टप्प्यांमध्ये काम पूर्ण केले जाणार
पुणे : पुण्यातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात, संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यान नव्याने तीन घाट उभारण्यात येणार आहे. यामध्ये मुळा-मुठा नदीच्या संगमाच्या ठिकाणी (संगमवाडी येथील बस पार्किंगजवळ) नव्याने सुशोभित घाट तयार करण्यात येणार आहे.
नदी पुनरूज्जीवन तथा नदी सुधार प्रकल्प ( रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) महापालिकेकडून हाती घेण्यात आला असून, ४४ कि.मी. अंतराचा नदी काठ सुशोभित करताना ११ टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. याकरिता सुमारे पावणे पाच हजार कोटींचा खर्च येणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे म्हणजेच संगमवाडी ते बंडगार्डन येथील काम महापालिकेकडून सुरू असून या ठिकाणी नदी काठाचे सुशोभिकरणाचे ३०० मीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. नुकतीच या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, या पहिल्या टप्प्यात आणखी तीन नवे घाट तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी २३ कोटी रूपये अधिकचा खर्च येणार आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यासाठी आधीचा सुमारे ३०० कोटी व आता २३ कोटी रूपये खर्च येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान ६०४ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
असे असतील तीन घाट
संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यान सीओईपी, मुळा-मुठा संगम व येरवडा येथील गणेश घाटाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सीओईपीचा व गणेश घाट मोठा करण्यात येणार आहे. तर संगमवाडी येथे मुळा मुठा नदीचा संगमाचे सौदर्य जवळून पाहता यावे, याकरिता नवीन घाट तयार करण्यात येणार आहे. याकरिता १५ कोटी रूपये खर्च येणार आहे. दरम्यान बोट क्लबमधून नदीकडे जाण्यासाठी सध्या अस्थित्वात असलेल्या मार्गाचे सुशोभिकरण करण्याबरोबरच, येथे बोटिंग करणाऱ्या नागरिकांसाठी अंडरपास ( रस्त्याच्या खालून भुयारी मार्ग) तयार केला जाणार आहे. यासाठी दोन कोटी रूपये खर्च येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.