पाणी बचतीचा नवा पर्याय :पाणी बचतीसाठी तरुणांचे नवे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 08:18 PM2019-07-15T20:18:01+5:302019-07-15T20:43:40+5:30
समाजात विविध क्षेत्रांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी दोन तरुणांनी पुढाकार घेतला आहे.
पुणे : समाजात विविध क्षेत्रांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. ही समस्या सोडवण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी दोन तरुणांनी पुढाकार घेतला आहे. फैजल हवा आणि जावेद हवा या दोन तरुणांनी पाण्याची बचत करणारे नवे नळ बनवले आहेत. नळाला स्टिक जोडण्यात आली असल्याने स्टिक दाबले की नळ लगेच बंद होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या नळांना वाडू किंवा वझू टॅप असे नाव देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, मशिदींना हे नळ बसवण्यासाठी या तरुणांनी प्रेरित केले आहे.
तवाकल्लाह जामा मस्जिद यांनी ५१ नळ, जामा मस्जिद खरलवाडीने २०, मस्जिद ई शम्स उल उलूम प्रेमसदन हाऊसिंग सोसायटी २० नळ बसवले आहेत. याचप्रमाणे, कँप नुरानी मस्जिद, संजय पार्क मस्जिद, विमाननगर मस्जिद, दिघी मस्जिद, गोकाक मस्जिद, अकसा मस्जिद येरवडा, कलवाड मस्जिद आदी ठिकाणी या नळांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे,
याबाबत फैजल म्हणाले, ‘मी चुलत भावापुढे पाणी बचतीसाठी नळांची कल्पना मांडली. तेल आणि गॅस उद्योगासाठी वाल्व तयार करणारे जावेद यांनी हे डिझाईन विकसित केले आहे. सेंसरद्वारे चालणारे नळ पाणी बचत करतात. पण, त्यांची किंमत खूप जास्त असते. हे नळ अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होतात.’