पर्यावरणपूरक बाप्पांसाठी नवीन मिश्रण; अभिजित धोंडफळे पेटंट मिळविणारे ठरले पहिले शिल्पकार
By नम्रता फडणीस | Published: August 17, 2023 05:45 PM2023-08-17T17:45:26+5:302023-08-17T18:00:23+5:30
या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे, ‘रविंद्र मिश्रण’...
पुणे : पीओपीच्या मूर्तीचा वापर टाळण्यासाठी आणि शाडू मातीच्या मूर्तीपेक्षाही वजनाला हलकी असणारी मूर्ती साकारण्यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी एक नवीन मिश्रण तयार केले आहे. या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे, ‘रविंद्र मिश्रण’. त्यांना या मिश्रणाचे पेटंट मिळाले असून, अशा पद्धतीचे पेटंट मिळविणारे ते पहिले शिल्पकार ठरले आहेत.
त्यांनी हे पेटंट देशाला अर्पण केले आहे. दरवर्षी गणेशोत्सवात भाविकांना मूर्ती कोणती घ्यायची असा प्रश्न पडतो.
शाडूची मूर्ती वजनाला जड असते तर पीओपीच्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया केली असल्याने त्यांचे विसर्जन होणे सहज शक्य नसते. पण आता या मिश्रणातून साकार झालेल्या ‘गणेशमूर्ती’ ख-या अर्थाने 'इको फ्रेंडली' ठरणार असल्याची माहिती शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गौरी भावे उपस्थित होत्या.
ते म्हणाले, आजोबांनी केलेला पांगुळ अळीचा गणपती पर्यावरण पूरक पेपर पल्पपासून 1955 मध्ये केलेली मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वडील रविंद्र यांचेही पर्यावरणपूरक कागदी पल्पचे अनेक गणपती पुण्यात आणि
पुण्याबाहेर गेले आहेत. यातूनच प्रेरणा घेत मी एका नवीन मिश्रणाच्या अभ्यासास सुरुवात केली. या मिश्रणावर अनेक प्रयोग केले गेले. सिव्हिल इंजिनिअर यांच्या टेस्टिंग लँबमध्ये कठीण चाचण्या करण्यात आल्या. अनेक माध्यमे हाताळल्यानंतर अनेक प्रयोगांच्या अंतिम 2019 मध्ये मिश्रणास यश मिळाले. जुलै 2019 मध्ये पेटंटसाठी नोंदणी केली आणि 2023 मध्ये पेटंट मिळाले.
या मिश्रणात या घटकांचा केला वापर
- गाळाची माती
- शाडू माती
- भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा
मिश्रणाची वैशिष्ट्ये-
हे मिश्रण पूर्णत: रसायन आणि रासायनिक क्रिया विरहित असल्याने विसर्जन केल्यानंतर ते झाडांना व कुड्यांमध्ये वापरु शकतो. या मिश्रणापासून साकार झालेल्या मूर्ती शाडूच्या तुलनेत हलक्या आहेत. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती लवकर सुकते. तसेच यावर इतर माध्यमांप्रमाणेच रंगकामही करता येते.