कराेडाे रुपयांचा पूल झाला मद्यपींचा अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 06:50 PM2019-05-21T18:50:34+5:302019-05-21T18:51:53+5:30
कराेडाे रुपये खर्च करुन डेंगळे पूलाला समांतर नवीन पूल बांधण्यात आला असला तरी उद्घाटन न झाल्याने सध्या ताे मद्यपींचा अड्डा झाला आहे.
पुणे : कराेडाे रुपये खर्चून पूल बांधण्यात आला खरा परंतु उद्घाटनाअभावी ताे झाला दारुड्यांचा अड्डा. वाहतूक काेंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी डेंगळे पुलाला समांतर पुल पुणे महानगरपालिकेकडून बांधण्यात आला. यासाठी तब्बल वीस काेटी रुपये खर्च करण्यात आले. पूल बांधल्यानंतर नागरिकांची वाहतूक काेंडीतून सुटका हाेईल अशी अपेक्षा हाेती. परंतु गेल्या काही दिवसांपासून पूल तयार असून देखील उद्घाटन न झाल्याने हा पूल सध्या दारुड्यांचा अड्डा झाला आहे.
कुंभारवेशीकडून काेर्टाकडे जाणाऱ्या डेंगळे पुलाला समांतर नवीन पूल तयार करण्यात आला आहे. या भागात हाेणारी वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी पालिकेने 142 मीटर लांबीचा तर 23.4 मीटर रुंद असा हा पूल तयार केला आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूला ३.७ मीटरचा पदपथ व सायकल ट्रॅक आहे. यासाठी पालिकेने 20 काेटी रुपये खर्च केले आहेत. पूल बांधून तयार असला तरी आचरसंहिता लागू झाल्यामुळे या पुलाचे उद्घाटन करण्यात आले नाही. त्यामुळे सध्या हा पूल बांधून जरी तयार असला तरी वाहनचालकांना ताे वापरता येत नाही. परिणामी या भागातील वाहतूक काेंडी तशीच आहे.
पूल बांधून तयार असला तरी उद्घाटनाअभावी तसाच पडून असल्याने गर्दुल्ले तसेच मद्यपींसाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. या ठिकाणी रात्रीच्यावेळी दारु पार्टी केली जात आहे. तसेच येथील भागातील नागरिकांच्या गाड्या या पुलावर लावण्यात येत आहेत. पूलाला आकर्षक अशी रंगरंगाेटी करण्यात आली हाेती. परंतु सुरुच न केल्याने काही समाजकंटकांनी या पुलाचा ताबा घेत ताे अवैद्य कामासाठी वापरण्यास सुरुवात केली. पुलाच्या दुभाजकांवर जागाेजागी थुंकण्यात आले आहे. तसेच इतर ठिकाणी दारुच्या बाटल्या देखील आढळून आल्या. त्यामुळे पूल तयार असला तरी केवळ माननीयांच्या हस्तेच त्याचे उद्घाटन करायचे असल्याने वाहतूक काेंडीचा सामना वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. तसेच हा पूल आता मद्यपींचा अड्डा झाला आहे.
दरम्यान निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आचारसंहिता शिथिल झाल्यावर या पुलाचे उद्घाटन हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच वाहनचालकांची वाहतूक काेंडीतून सुटका हाेणार आहे.