मंचर पोलीस ठाण्याची नवी इमारत, निवासस्थानांसाठी मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:20+5:302021-07-03T04:08:20+5:30
घोडेगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंचर पोलीस ठाण्यासाठी नवी इमारत आणि येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा ...
घोडेगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंचर पोलीस ठाण्यासाठी नवी इमारत आणि येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे निकाली निघाला आहे. पोलीस ठाण्याच्या नवी इमारत व निवासस्थानासाठी २६.३२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
घोडेगाव पोलीस स्टेशनसाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी इमारत मंजूर करून दिली होती. त्याचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांपासून त्याचा वापरदेखील सुरू झाला आहे. मात्र, घोडेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी चांगली निवासस्थाने नव्हती. जुन्या निवासस्थानांची इमारत मोडकळीस आल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना नादुरुस्त इमारतीमध्ये राहावे लागत होते.
ही अडचण लक्षात घेऊन वळसे पाटील यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांच्यासाठी निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावला आहे. नव्या निवासस्थानांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, गटाराची पाईपलाईन, गॅस पाईपलाईन, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, संरक्षक भिंत, गेट, रेन वॉटर हारवेस्टिंग, बागबगीचा, पंप हाऊस, सीसीटीव्ही, सोलर, अग्निशमन यंत्रणा, अंतर्गत रस्ते, वाहनतळ अशा स्वरूपाचे काम होणार आहे. या कामासाठी १४.८१ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
मंचर पोलीस स्टेशनसाठी नवीन इमारत व्हावी, अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. पोलीस स्टेशनसाठी जागा पाहण्याचे काम बरेच दिवस सुरू होते, शेवटी क्रीडा संकुलजवळ पोलीस ठाण्यासाठी नवीन जागा निश्चित करण्यात आली. या जागेवर अठरा हजार चौरस फुटांचे पोलीस स्टेशन बांधण्यात येणार असून, यासाठी ११.५१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामध्ये दोन मजली पोलीस स्टेशन इमारत, पाण्याची पाईपलाईन, विद्युतीकरण, अग्निशामन यंत्रणा, सोलर, संरक्षक भिंत, वाहनतळ, फर्निचर असे काम होणार आहे.