लोणीकंद येथील तलावात नव दांपत्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 05:53 PM2019-09-18T17:53:36+5:302019-09-18T17:53:57+5:30
आत्महत्या केलेले कुटुंब हे सुशिक्षित दांपत्य होते.
लोणीकंद : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पाठीमागील तलावात नवदांपत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी ( दि. १८) उघडकीस आली. मंगेश म्हसू नागरे (वय २६) व प्रियांका मंगेश नागरे (वय २० रा. सोहम रेसीडेन्सी सोसायटी, वाघोली मुळ रा. अस्तगाव, नाशिक) यांचे मृतदेह आढळले आहेत. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गणेश म्हसू नांगरे (रा. सोहम रेसीडेन्सी सोसायटी, वाघोली )यांनी फिर्याद दिली असून त्यांनी लोणीकंद पोलिसात नवरा बायको बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसापूर्वी दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद जवळील सुरभी हॉटेल समोरील तलावात सकाळीच अनोळखी तरुण तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोणीकंद पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तरुण तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. भाऊ गणेशला बोलवल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली असून नंतर ससूनकडे रवाना करण्यात आले आहे. हे दोघे नवरा बायको असून दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. मंगेशचे इंजिनिअरींग तर प्रियांका चे १३ वी पर्यंत शिक्षण असून त्याचे इंग्रजी हिंदी मराठीवर प्रभुत्व असून सुशिक्षित दांपत्य होते. कुटुंबातील कुरबुरी असल्याने ते कोणाला काहीएक न सांगता १५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता घरातून निघुन गेले होते. लोणीकंद पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनखाली याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार मोहन अवघडे व सहकारी करत आहेत.