नवे संकट; शहरातील ऑक्सिजन संपत आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:06+5:302021-04-17T04:11:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील रुग्णालयांमध्ये लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असून, एक-दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक ...

New crisis; The city ran out of oxygen | नवे संकट; शहरातील ऑक्सिजन संपत आला

नवे संकट; शहरातील ऑक्सिजन संपत आला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील रुग्णालयांमध्ये लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असून, एक-दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने काही रुग्णालयांमध्ये रुग्ण घेणे बंद करण्यात आल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. शहरात पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये साधारण २५० मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन लागतो. परंतु, उत्पादनापेक्षा मागणी वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

ऑक्सिजनवरील आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरातील पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास साडेपाच हजार रुग्ण ऑक्सिजनवर आणि बाराशे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा काही दिवसांपासून कमी होत आहे. रुग्ण वाढल्याने मागणी वाढली आहे.

यासोबतच गृह विलगीकरणात असलेल्या अनेक रुग्णांकरिता घरीच ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट येऊन थडकल्यानंतर 'ऑक्सिजन'च्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन ३० ते ४० टन मागणी होती. मात्र, मार्च आणि एप्रिलमध्ये ही मागणी दहापट वाढली आहे.

आजमितीस पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यासाठी दिवसाकाठी ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. मागील दोन दिवसांपासून हा पुरवठाच कमी झाला आहे. उत्पादकांकडून ऑक्सिजन मिळत नसल्याने पुरवठादारही हतबल झाल्याचे चित्र आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून हा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी पुरवठा वाढताना दिसत नाही.

गुरुवारी याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर याबाबत शुक्रवारीही बैठक घेण्यात आली असून पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

-------------------------

मराठवाड्याला ऑक्सिजन दिल्याने तुटवडा?

राज्य शासनाने मराठवाड्याला १५० मेट्रिक टन ऑक्सिजन पाठविण्याच्या सूचना एफडीएला दिलेल्या आहेत. त्यामुळे तिकडे ऑक्सिजन पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोणत्या रुग्णाला किती लागतो ऑक्सिजन?

-----------------------

- ऑक्सिजनवरील

रुग्ण : ८ ते १२

लिटर दर मिनिटाला

व्हेंटिलेटर

- 'हाय-फ्लो'

रुग्ण - ४० ते ५० लिटर

दर मिनिटाला

-व्हेंटिलेटरवरील रुग्ण - ५० ते ९० लिटर

दर मिनिटाला

-पालिकेच्या रुग्णालयांची मागणी : ४० मेट्रिक टन

-खासगी रुग्णालयांची मागणी : २०० ते २३० मेट्रिक टन

----------------------

बेड रिक्त; पण ऑक्सिजनच शिल्लक नाही

ऑक्सिजनच शिल्लक नसल्याने, ऑक्सिजन बेड रिक्त असूनही कोरोनाबाधित रुग्णांना प्रवेश नाकारले जात आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बेड उपलब्धता दर्शविणाऱ्या डॅश बोर्डवर जम्बो हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड शिल्लक असल्याचे दाखवत आहे. परंतु, महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यावर बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. तर बेड उपलब्ध झाल्यावर तुम्हाला कळविले जाईल, असे सांगितले जात आहे. आपल्याला बेड उपलब्ध झाल्यावर फोन येईल म्हणून, रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक आपला संपर्क क्रमांक देत आहेत. पण चार-पाच तास झाले तरी अनेकांना फोनच न आल्याने अनेकांनी आपल्या भागातील नगरसेवकांना बेडसाठी फोनाफोनी सुरू केली. त्यावेळी संबंधितांनी महापालिका व जम्बो हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला असता, बेड आहेत; पण ऑक्सिजन नाही म्हणून प्रवेश नाकारले जात आहेत.

Web Title: New crisis; The city ran out of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.