रेल्वेत चोरी करणाऱ्या जोडप्याच्या जीवनाला मिळणार नवी दिशा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 11:06 AM2019-11-08T11:06:43+5:302019-11-08T11:20:55+5:30
कष्टाने पैसे कमावणे जमेना म्हणून नवरा-बायको करायचे चोऱ्या
युगंधर ताजणे-
पुणे : पोटाची खळगी भरण्याकरिता कुठेही काम करण्याची तयारी असणाऱ्या त्या दोघांना एकाच ठिकाणी आपले बस्तान बसविणे अवघड झाले. त्यात अनेकांकडून उसनवारी करून पैसे घेतल्याने डोक्यावर कर्जाचा बोजादेखील वाढला. एक काम धडपणे करता येईना; त्यामुळे दोघांच्या पदरी निराशा आली. काही केल्या कष्टाने पैसे मिळविणे जड जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चक्क रेल्वेत चोºया करण्याचा उद्योग सुरू केला. सुरुवातीला बरीचशी मिळकत मिळाली; मात्र चोरीचा मामला किती दिवस टिकणार? शेवटी रेल्वेपोलिसांच्या तावडीत दोघे सापडले. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली.
संतोष (वय २५) आणि रेखा (२०, दोघांची नावे बदलली आहेत) हे दोघेही मूळचे राहणारे मुंबईचे. काही दिवसांपासून कामाच्या शोधात वेगवेगळया ठिकाणी फिरत होते. या दोघांना पुणे रेल्वे पोलिसांनी रेल्वेत मोबाईल चोरताना अटक केली. एकदाच मोठी रक्कम पदरात पाडून यंदाची दिवाळी मोठ्या धडाक्यात साजरी करण्याचा त्यांचा इरादा होता. संतोष आणि रेखा यांची ओळख एका रेल्वेत झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही डिसेंबर २०१८मध्ये विवाहबद्ध झाले. संतोष एका डीजेच्या व्यवसायात होता, तर रेखा गृहिणीची जबाबदारी पार पाडत होती. या वेळी रेखाला एका मानसिक आजाराला सामोरे जावे लागले. तेव्हापासून दोघांना पैशांची चणचण जाणवू लागली. यानंतर दोघेही कामाच्या शोधात पुण्याला आले. येथे ते आपल्या एका नातेवाइकाकडे राहत होते. मात्र, त्यांनी त्यांना घरात राहण्यास मनाई केली. यानंतर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न त्यांना सतावू लागला. तीन दिवसांपासून खिशात दमडी नसताना काय करावे, यामुळे ते दोघेही चिंताग्रस्त झाले होते. घरातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाचा आधार शोधला.
काम शोधण्याचे सर्व पर्याय बाद झाल्यानंतर सरतेशेवटी संतोषने चोरी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्याने रेल्वे फलाटावरून काही मोबाईल चोरले आणि एकाला कमी किमतीत ते विकून पैसा मिळविला. या पैशांतून तिकीट काढून पुन्हा मुंबईला जाण्याचे दोघांनी ठरविले होते. तिकीट काढून रेल्वेत बसल्यानंतर काही वेळातच रेल्वे पोलिसांनी त्यांना पकडले. पोलिसांना त्यांच्याकडून काही मोबाईल जप्त केले.
........
जूनमध्ये त्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर येरवडा तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली. पाच सप्टेंबरनंतर त्यांच्यावर आणखी तीन गुन्ह्याची नोंद झाली. या तिन्ही गुन्ह्यांतील शिक्षेत एकूण ४ हजार ६०० रुपये दंड त्यांना ठोठावण्यात आला. त्यांपैकी अवघ्या ३०० रुपयांचा दंड न भरल्यास त्यांना पुढील काही दिवस तुरुंगात राहावे लागणार होते.
गुन्ह्याची शिक्षा भोगल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्यामुळे त्यांना आणखी ४० दिवस तुरुंगात राहावे लागणार होते. प्रत्येकी ३०० रुपये दंडाची रक्कम भरून त्या दोघांची सुटका होणार होती. परंतु, तो दंड भरण्याइतकेही पैसे त्यांच्याजवळ नव्हते. घरच्यांनी त्यांच्यांशी संबंध तोडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. या सगळ्यात सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या २०१४ पासून सुरू असलेल्या ’प्रिझन क्लिनिक अंडर कम्युनिटी लीगल केअर सेंटर’ विभागाच्या वतीने त्यांना सहकार्य करण्यात आले. यात प्राध्यापक रूपल ऋतुदेसाई, प्रा. आत्माराम शेलके, प्रा. अदिती माने आणि प्रा. शिरीष कुलकर्णी यांनी त्यांचे समुपदेशन व नव्याने सुरुवात करण्याविषयी मार्गदर्शन केले.
तुरुंगातील कैद्यांकरिता काही विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात
येते. आमच्या महाविद्यालयाचे प्रिझन क्लिनिक केअर सेंटर हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संलग्न असल्याने त्यांचीही या कामी मदत होते. मानवी हक्क व संरक्षणअंतर्गत कैद्याला त्याच्या पुढील आयुष्याकरिता समुपदेशन करून नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रेरित करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. संबंधित प्रकरणातदेखील कैद्याला मार्गदर्शन करून सद्य:स्थितीशी दोन हात करण्याचे बळ विभागामार्फत करण्यात आले आहे, याचे समाधान वाटते. - डॉ. शशिकला गुरपूर, संचालक व प्रमुख सिम्बायोसिस लॉ कॉलेज
...........