मनपाच्या अंदाजपत्रकातून पुन्हा नवी स्वप्ने
By admin | Published: January 10, 2016 03:48 AM2016-01-10T03:48:54+5:302016-01-10T03:48:54+5:30
महानगर पालिकेच्या गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ चे अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे.
पुणे : महानगर पालिकेच्या गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ चे अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे. जुन्या अंदाजपत्रकातील अनेक योजना अपुऱ्या आहेत. काहींना सुरूवातही झाली नाही. भामा-आसखेडसारखी पाणी योजना अर्धवट असून वायमॅक्ससारख्या योजनेला मुहूर्तच लाभलेला नाही.
सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकाची मुदत आता पूर्ण होत आली आहे. अखेरचे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या अंदाजपत्रकावर दृष्टिक्षेप टाकला असता पालिका प्रशासनाचे अपयशच नजरेत येते. पुण्याचा आय. टी. हब म्हणून देशभरात होणारा बोलबाला लक्षात घेऊन प्रशासनाने मागील वर्षी इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणारे वाय-मॅक्स तंत्रज्ञान संपूर्ण शहरात सुरू करण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले होते, त्याचा साधा आरंभही प्रशासनला करता आलेला नाही. त्यासाठी केलेली १ कोटी रुपयांची तरतूद आता मार्चअखेरीस दुसरीकडे वर्ग करून वापरण्यात येईल. आय. टी. हब म्हणून पुण्याच्या लौकिकात भर टाकेल, असे काहीही वर्षभरात प्रशासनाने केले नाही. मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, भामाआसखेड योजनांच्या बाबतीतही असेच झाले आहे. भामा आसखेड योजनेचे काही काम झाले, मात्र अजूनही ही योजना पुर्णाशांने सुरू झालेली नाही. (प्रतिनिधी)