८० वर्षांनी या शाळेत घेतला मुलींनी प्रवेश : महापौरांनी केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:15 PM2018-06-15T18:15:05+5:302018-06-15T18:15:05+5:30
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये तब्बल ८० वर्षांनी मुलींनी प्रवेश घेण्यास परवानगी दिल्याने पहिल्यांदाच ''ती''चे पहिले पाऊल शाळेत पडल्याचे बघायला मिळाले. महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी नव्या चिमुरड्यांचे स्वागत केले.
पुणे : टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये तब्बल ८० वर्षांनी मुलींनी प्रवेश घेण्यास परवानगी दिल्याने पहिल्यांदाच ''ती''चे पहिले पाऊल शाळेत पडल्याचे बघायला मिळाले. महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी नव्या चिमुरड्यांचे स्वागत केले.
बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी या संस्थेची स्थापना केली होती.सुरुवातीला या शाळेत मुलींना प्रवेश दिला जायचा. मात्र काही काळाने मुलींसाठी अहिल्यादेवी शाळा सुरु केल्याने ही शाळा फक्त मुलांची म्हणून ओळखली जाऊ लागली. मात्र पुन्हा ऐंशी वर्षांनंतर सहशिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन मुलींना प्रवेश देण्यात आले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या प्रवेशाचा प्रसंग डोळ्यात साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
आज महापौरांनी विद्यार्थिनींशी गप्पा मारत पहिला तास घेतला. त्यांच्यासह पालक आणि शाळेचे माजी विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते.महापौर यावेळी म्हणाल्या की, या शाळेत मुलींना प्रवेश देणे अतिशय उत्तम निर्णय असून यामुळे शाळेच्या लौकिकात भर पडेल. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेल्या कामगिरीची आठवणीही त्यांनी जागवल्या.शाळेचे मुख्याध्यापक नागेश माने यांनी सहशिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले. या निमित्ताने सर्वच विद्यार्थ्यांचा विकास होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मुलींना प्रवेश मिळावा अशी माजी विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मागणी असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.