सामुदायिक विवाहातून पुण्यातील कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने घातला नवा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:49 AM2018-01-25T11:49:17+5:302018-01-25T11:52:50+5:30
एकीकडे लग्न आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, हुंडा आदी समस्या असताना दुसरीकडे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने नवा आदर्श घालून देत सामुदायिक विवाह सोहळा पुण्यात आयोजित केला होता. यात सहभागी तिनही जोड्यांनी समान खर्च केला.
पुणे : एकीकडे लग्न आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, हुंडा आदी समस्या असताना दुसरीकडे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने नवा आदर्श घालून देत सामुदायिक विवाह सोहळा पुण्यात आयोजित केला होता. यात सहभागी तिनही जोड्यांनी समान खर्च केला.
१९९३ साली स्थापन झालेली कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायत संघटना पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमधील कचरावेचकांची एक कामगार संघटना आहे. संघटना १० हजाराहून अधिक कचरावेचकांसह कार्य करते. सभासदांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्याच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करते. यावर्षी संघटना रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्ताने वर्षभर निरनिराळे कायक्रम आयोजित केले आहेत. या मालिकेतील सामुदायिक विवाह सोहळा हा दुसरा कार्यक्रम हमाल भवन, मार्केट याड येथे दि. २१ जानेवारीला झाला. सामुदायिक विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या तिन्ही जोड्यांनी विवाह, हॉल, जेवण इत्यादींचा खर्च मिळून केला.
सामुदायिक विवाहाविषयी संघटनेच्या सभासद सरूबाई म्हणाल्या, की माझ्या मुलाचे लग्न मागील सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाले होते. त्यामुळे नातेवाईकांच्या मुलीचे लग्न पण या सोहळ्यात करायचे ठरवले. अतिशय आनंद होत आहे, की संघटनेच्या २५व्या वर्षी मी पुन्हा या विवाहसोहळ्यामध्ये सहभागी झाले.
२१ जानेवारी रोजी तिन्ही जोड्यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला. विवाह समारंभावर होणारा वायफळ खर्च, पैशाची उधळपट्टी, त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर होणारा कर्जाचा बोजा, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याकरिता, प्रेमविवाह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालविवाह व हुंडाप्रथा रोखण्याकरिता या सर्व बाबी लक्षात घेऊन या सोहळ्याची आखणी करण्यात आली होती. यामध्ये दोनही कुटुंबाने लग्नाचा खर्च समान केला.
देशातील पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतीराव फुले यांनी घडवून आणला. पुरोहितांशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर, १८७३ रोजी पार पाडला. या विवाहाचा खर्च स्वत: सावित्रीबाई फुले यांनी केला होता. यामध्ये सत्यशोधक पद्धतीने जोडप्यांनी शपथ घेतली. आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही दोघे एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करीत आहोत. त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आम्ही परस्परांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांचा आनंदाने स्वीकार करीत आहोत. तसेच कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडू. तसेच समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्नशील राहू. माझ्या जीवनसाथी सोबत कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही, दारूपासून दूर राहीन, मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करीन, अशी प्रतिज्ञाच जोडप्यांनी केली.
अक्षता म्हणून धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरल्या. एकीकडे काही लोक असे आहेत, जे एकावेळी उपाशीपोटी झोपतात आणि प्रत्येक लग्नात सरासरी १० किलो धान्य आपण अक्षता म्हणून टाकतो. आपल्या देशात दरवर्षी २५ कोटी लग्न होतात. तर २५० कोटी धान्य वाया जाते. म्हणून अक्षतासाठी वाया जाणारे धान्य वाचवून संघटनेने साधना व्हिलेज या मानसिक विकलांगसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगी म्हणून दिले.
या विवाहसोहळामध्ये कचरावेचकांची पुढच्या पिढीतील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सजावट, जेवण वाढणे अशा अनेक कामांना मदत केली. वरातीमध्ये नाचण्याचा आनंदही घेतला.