सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवीन फंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 01:38 PM2019-12-21T13:38:49+5:302019-12-21T13:42:06+5:30

तरुणाईसह ज्येष्ठांनाही घालतात भुरळ

New fraud funday used from cyber criminals | सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवीन फंडे

सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवीन फंडे

Next
ठळक मुद्देसायबर गुन्हेगारीत वाढ; सोशल मीडियावर मैत्री करून घालतात लाखोंचा गंडाओएलएक्स, ट्रू कॉलर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवणूक वाढली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, आमिषाला बळी पडून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका दिवसांत फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ओएलएक्स, ट्रू कॉलर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवणूक वाढली आहे.
इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका व्यक्तीला कॅनडावरून पार्सल पाठविलेली वस्तू घेण्यासाठी स्टॅम्प ड्यूटी भरण्यास सांगून तीन लाख २३ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय व्यक्तीने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सिंहगड रस्त्यावरील राजयोग सोसायटीमध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेला पंचवीस लाखांचे लोन मंजूर करून देतो, असे सांगून वेळोवेळी एक लाख ३७ हजार ५०० रुपये बँक खात्यावर पाठवायला सांगून लोन मंजूर न करता आर्थिक फसवणूक केल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करूनही सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.


सिंहगड रस्ता परिसरामध्ये नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे.  यामध्ये मुख्यता वृद्ध व्यक्तींना लक्ष करण्यात येत आहे. त्यासोबतच महिलांनादेखील लक्ष केले जात आहे.  बऱ्याचदा उच्चशिक्षित व्यावसायिक तरुणदेखील फसविले जात आहेत. 
.........
गेल्या काही दिवसांत सायबर गुन्ह्यामध्ये नवीन प्रकारचे गुन्हे समोर आले आहेत. या गुन्ह्यांची पद्धत देखील वेगळी आहे. सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या ऑनलाइन गुन्ह्यांना नागरिकांनी बळी पडू नये. आर्थिक व्यवहार करताना खात्री करूनच करावेत.- नंदकिशोर शेळके,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे
........
* सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे फंडे 
फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
फेसबुक अथवा इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या व्यक्तीला मोबाइल क्रमांक देऊ नका.
परदेशातून पाठविलेले भेटवस्तू सोडवून घेण्यासाठी पैसे भरू नये.
सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये.
पैसे भरण्यास सांगत असल्यास आधी संबंधित विभागाला फोन करून खात्री करा.
विश्वसनीय वेबसाइटवरून खरेदी करा.  
सर्च इंजिनवरून कस्टमर केअर क्रमांक घेऊ नका.
फोन क्रमांक अधिकृत वेबसाइटवरूनच घ्या.
ओटीपी शेअर करू नका, आमिषाने कोणत्याही अनोळखी व्यक्तीला रक्कम पाठवू नका.
यूपीआय पिन इतर कुणाशीही शेअर करू नका. 
.......
सैन्यदलात जवान असल्याचे भासवून फसवणूक
ओएलएक्स या ऑनलाइन साईटवर खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. यामध्ये सायबर गुन्हेगार सैन्यदलात जवान असल्याचे भासवून आणि बदली झाल्याचे सांगत कार, बुलेट, मोबाइल, टीव्ही, फ्रिज आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू विक्रीसाठी टाकतात. सैनिकी वेशभूषेतील बनावट ओळखपत्र ते व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून सुरुवातीला विश्वास संपादन करतात. तसेच स्वस्तात वस्तू विकत मिळत असल्याने ग्राहकदेखील अ‍ॅडव्हान्स रक्कम ऑनलाईन भरतात त्यानंतर मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
.......
कॅटफिशिंग : कस्टम ड्यूटी चार्जेसच्या नावाखाली आर्थिक फसवणूक
2- विदेशातील महिलांच्या नावाने बनावट प्रोफाइल बनवून खोटे प्रेमसंबंध प्रस्थापित करतात. तरुणांना भावनिकदृष्ट्या चॅटिंग करून सायबर गुन्हेगार समोरच्या व्यक्तीला जाळ्यात ओढण्यात यशस्वी होतो. त्यानंतर प्रत्यक्ष भेटण्याचे खोटे वचन देत गिफ्ट पार्सल पाठवले, असे सांगण्यात येते. त्यानतंर दिल्ली येथील कस्टममध्ये पार्सल अडकले असल्याचा फोन येतो, कस्टम ड्यूटी चार्जेसच्या नावाखाली रक्कम भरण्यास भाग पाडून फसवणूक करतात.
.......
सुंदर तरुणींसोबत नलाइन डेटिंगचे आमिष
3- सायबर गुन्हेगार विविध वेबसाइटवर व अ‍ॅप्सवर सुंदर तरुणींचे फोटो अपलोड करतात. या तरुणींसोबत ऑनलाइन डेटिंगसाठी ठराविक नोंदणी फी भरल्यास त्या तरुणीचा मोबाइल क्रमांक देण्यात येतो. ही तरुणी पुढे मोबाईलवर बोलून तरुणाला जाळ्यात अडकवून हॉटेल बुकिंग, साइट सीनसाठी वेगवेगळी रक्कम तिच्या खात्यावर भरण्यास भाग पाडते व त्यानंतर त्या तरुणीचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ होतो. अशा प्रकारे तरुणांची फसवणूक करण्यात येते.
...............
ट्रू कॉलरवर येत असलेल्या नावामुळे नागरिकांची होते फसवणूक
4 सायबर गुन्हेगार ट्रू कॉलरवर नामांकित एजन्सीमालकाच्या नावाने मोबाइल क्रमांक सेव्ह करतात. यानंतर एखादा बँक कर्मचाºयाला कॉल करतो. ट्रू कॉलरवर नामांकित एजन्सीचे नाव येत असल्याने बँक कर्मचाºयालादेखील विश्वास बसतो. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट चेक पाठवून रक्कम एखाद्या बनावट बँक खात्यावर पाठवायला सांगतात. काही नागरिकांनादेखील असे कॉल खरे वाटत असल्याने तेदेखील संबंधित खात्यावर रक्कम पाठवतात. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
.........

Web Title: New fraud funday used from cyber criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.