पुणे महापालिकेचा नवा फंडा! प्लास्टिकचा असाही वापर; बॉटल्सपासून बनविणार 'टी शर्ट'
By राजू हिंगे | Published: May 9, 2023 03:19 PM2023-05-09T15:19:32+5:302023-05-09T15:19:40+5:30
पुणे महापालिकेकडे जमा झालेल्या २६ टन प्लास्टिकपैकी १० टन पथ विभागाला तर उरलेले १६ टनचे टी शर्ट बनवणार
पुणे: पुणे महापालिकेने प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला असुन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २६ टन प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. त्यातील १० टन प्लास्टिक पालिकेच्या पथ विभागाला देउन ते डांबरात मिक्स करून ते रस्ता बनवण्यासाठी वापरले जाणार आहे. उर्वरित 1६ टन प्लास्टिक फिल गुड इको नॅचर संस्थेच्या माध्यमातुन टी शर्ट बनविण्यासाठी वापरले जाणार आहे.
शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरिकांना प्लास्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एक फेब्रुवारी रोजी ‘प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धे’ची घोषणा केली होती. महापालिकेच्या वतीने शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी आणि नागरीकांनाही प्लॅस्टिक कचरा संकलनाची सवय लागावी यासाठी खास 'प्लॅस्टिक कचरा संकलन स्पर्धा' भरविण्यात आली आली होती. स्पर्धकांनी आपल्या घरातील, कामाच्या ठिकाणातील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या प्लॅस्टिक बॉटल्स संकलित केल्या आहेत.कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्ट्रिक बाइक अशा स्वरूपाची बक्षिसेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते. वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धतुन महापालिकेकडे २६ टन प्लास्टिक जमा झाले आहे. त्यातुन म्युरल्स बनवणार होतो. मात्र यासाठी बराच वेळ जाणार होता. पण आता पुणे महापालिकेच्या पथ विभागाला १० टन प्लास्टिक दिले जाणार आहे. रस्ता तयार करताना पथ विभाग प्लास्टिकचा वापर करून प्लॅस्टीक गॅरियुनल्स डांबरात मिक्स करून ते रस्ता बनवण्यासाठी वापरले जाणार आहे. त्याबाबतचे पत्र देखील पथ विभागाला देण्यात आले आहे. उर्वरित १६ टन प्लास्टिक हे टी शर्ट बनवण्यासाठी वापरले जाणार आहे. त्यासाठी फिल गुड इको नॅचर संस्थेबरोबर चर्चा केली होती. त्यानुसार ते पालिकेला १ हजार ६०० टी शर्ट तयार करून देणार आहेत. या टी शर्टची किमंत २५० रूपये आहे. हे टी शर्ट पालिकेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात वापरणार आहोत. लवकरच हे टी शर्ट महापालिकेला मिळणार आहेत,असे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.