फसवणुकीचा नवा ‘गुजरात पॅटर्न’; पुण्यात डांबर व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:23 PM2022-06-30T12:23:22+5:302022-06-30T12:25:01+5:30
नवीन सिरिजच्या नोटा देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला ३५ लाखांचा गंडा...
पुणे : व्यवसाय व अन्य कारणांवरून गुजरात पॅटर्नचा खूप गाजावाजा झाला आहे. त्यात आता फसवणुकीचा नवा ‘गुजरात पॅटर्न’ पुढे येत आहे. गुजरात निवडणुकीत जुन्या नोटांच्या बदल्यात दुप्पट नवीन नोटा देतो, असे आमिष दाखवून पुण्यातील एका अंडी व्यावसायिकाची २ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर आता पुण्यातील एका डांबर व्यावसायिकाला नवीन सिरीजच्या दुप्पट नोटा देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांना गंडा घालण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सादिक मुबारक शेख (वय ५६, रा. मुंढवा), जसविंदर ऊर्फ जस्सी तारासिंग गुणदेव (५५, रा. रविवार पेठ) या दोघांना अटक केली. तसेच जितेंद्र मेहता (रा. भरूच, गुजरात) याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कॅम्पमधील ५२ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली. ही घटना २२ मे ते २८ जून २०२२ या कालावधीत घडली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा डांबर आणि ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. एका मित्रामार्फत त्यांचा आरोपी शेख याच्याशी मुंढवा येथील ऑफिसमध्ये परिचय झाला होता. त्यावेळी शेख याने त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या नवीन एका सिरिजच्या नोटा आहेत. गुंतवणूक केल्यास तुम्हाला एका नोटेच्या बदल्यात दोन नोटा मिळतील, असे प्रलोभन दाखवले. शेख हा जसविंदर याला २६ मे रोजी फिर्यादींच्या ऑफिसमध्ये घेऊन आला.
जसविंदर याने जितेंद्र मेहता याचे नाव सांगून गुजरात येथून तो आपल्याला एकच्या बदल्यात दुप्पट देणार असल्याचे सांगितले. त्यावरून फिर्यादीने बँकेतून पैसे काढून २० लाख रुपये शेख आणि जसविंदर यांच्या हवाली केले. दुसऱ्यादिवशी डबल नोटा देण्याचे ठरले होते. फिर्यादी यांनी फोन केला तेव्हा त्यांना आपल्याला भूज येथे जावे लागेल. तुम्ही आणखी जास्त गुंतवणूक केली, तर मोठा फायदा होईल, असे सांगितले. गुजरात येथे जाताना आणखी १५ लाख रुपये घेतले. तेथे गेल्यानंतर ते पैसे जितेंद्र मेहता नावाच्या माणसाने पाठवलेल्या व्यक्तीला दिले. त्याने मेहता याचे नाव सांगून नवीन नोटांची बॅग दाखवली. आरोपींनी पैसे तुमच्या ऑफिसला पोहोचतील असे सांगितले.
जसविंदर ८ जूनरोजी एक बॅग फिर्यादींच्या ऑफिसमध्ये ठेवून गेला. त्यांनी बॅग उघडून पाहिली, तर त्यात भारतीय बच्चोंका बँक असे लिहिलेल्या खेळण्यातील नोटा मिळून आल्या. त्यावर आरोपींना फोन करून विचारले असता, चुकून बॅग आल्याचे सांगितले. त्याचवेळी आरोपींनी फिर्यादी यांना आणखी १५ लाखांची मागणी करून एक कोटी देण्याचे प्रलोभन दाखवले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पूर्वी दिलेल्या पैशाची मागणी केली.
अन् बनावट नोटा सापडल्या
दरम्यान, गस्तीवर असताना कर्मचारी शंकर नेवसे यांना लष्कर परिसरातील कुमार पॅव्हेलियन येथे १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, उपनिरीक्षक नितीन कांबळे, कर्मचारी प्रमोद कोकणे, विनोद चव्हाण, निखिल जाधव, नागनाथ राख यांच्या पथकाने कॅम्पमधील फिर्यादीच्या कार्यालयात छापा टाकला. त्यात बनावट नोटा सापडल्या. चौकशीत या व्यावसायिकाचीच फसवणूक झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या व्यावसायिकाची फिर्याद घेऊन दोघांना अटक केली.
पाचशेच्या एका नोटेच्या बदल्यात दोन नोटा देतो, असे सांगून कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाशी संपर्क साधावा.
- क्रांतिकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा