‘परिवर्तन’ महोत्सवातील तरूणांमध्ये नवी उमेद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 08:40 PM2020-01-04T20:40:30+5:302020-01-04T20:45:49+5:30
जळगावचाा महोत्सव पुण्यात
पुणे : सांस्कृतिक क्षेत्रात आज अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आजूबाजूची सांस्कृतिक उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. नैराश्याचे वातावरण पहायला मिळत असताना 'परिवर्तन' सारखे आशेचे किरण दिलासा देणारे ठरतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक आदानप्रदानात सकारात्मक पायंडा निर्माण केला आहे, असा आशावाद बुधवारी 'परिवर्तन महोत्सवा'दरम्यान व्यक्त करण्यात आला. सांस्कृतिक महोत्सव तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण करतात, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
जळगावचा 'परिवर्तन' हा कला महोत्सव पुण्यात ज्योत्स्ना भोळे सभागृहात 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी, ३ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. जळगाव येथील परिवर्तन संस्थेतर्फे, नाटकघर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या सहकार्याने पुण्यात कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रंगांच्या फटकाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी ‘लोकमत समूह’ संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, रंगकर्मी नंदू माधव, अतुल पेठे, शुभांगी दामले, राष्ट्रसेवादलाचे गोपाळ नेवे, मंजूषा भिडे, हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . कँन्हव्हास वर रंगाचे फटकारे मारून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शिरिष बर्वे, सोनाली पाटील, हर्षदा कोल्हटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .
पहिल्या दिवशी शंभु पाटील लिखित व दिग्दर्शित 'गांधी नाकारायचाय ..पण कसा ?' हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील व विजय जैन या कलावंतानी सादर केले. राहुल निंबाळकर यांनी प्रकाशयोजना, तर पार्श्वसंगीत वसंत गायकवाड यांचे होते. पहिल्या दिवसाच्या या वैचारिक अभिवाचनाने सर्वच रसिकांना अंतर्मुख केले.
शनिवारी 'अमृता, साहिर, इमरोज' हे नाटक, तर 'नली' या एकल नाट्याची रसिकांनी अनुभूती घेतली. संकल्पना राहुल निंबाळकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे होते. जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील या कलावंतांनी याचे सादरीकरण केले. निर्मिती प्रमुख अंजली पाटील व चंद्रकांत इंगळे होते.
----
खान्देशच्या सांस्कृतिक क्षेत्राला बळ
परिवर्तन या संस्थेने आपल्या परिवर्तनशील उपक्रमांमधून जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. 'परिवर्तन' निर्मित कलाकृती व कलावंत यांचे कार्यक्रम आता पुण्या, मुंबई येथे नियमितपणे आयोजित केले जात आहेत. खान्देशामधील संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे, हे पहिल्यांदा घडत आहे . खान्देशामधील सांस्कृतिक क्षेत्राला बळ देणारी ही गोष्ट आहे .