पुण्याच्या हेल्मेटसक्तीवर पिंपरीचिंचवडच्या दुकानदाराची नामी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:57 PM2019-01-14T15:57:13+5:302019-01-14T15:59:46+5:30
पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवर दापाेडी भागातील एका दुकानदाराने नामी शक्कल लढवली आहे. या दुकानात हेल्मेट चक्क भाड्याने मिळतात.
पुणे : एक जानेवारीपासून पुणे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या आधी अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली हाेती परंतु नागरिकांच्या राेषामुळे मागे घ्यावी लागली हाेती. यंदा मात्र पाेलिसांनी नागरिकांमध्ये हेल्मेटबाबत माेठ्याप्रमाणावर जनजागृती केल्याने तसेच माेठ्याप्रमाणावर कारवाई करत असल्याने नागरिकही आता हेल्मेट वापराबाबत सजग झाले आहेत. पुण्यात हेल्मेटसक्ती असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये हेल्मेट सक्ती लागू नाही. त्यामुळे ज्यांना कामानिमित्त पुण्यात यावं लागतं त्यांच्यासाठी दापाेडीतील एका हेल्मेट दुकानदाराने नामी शक्कल लढवली आहे. या दुकानात हेल्मेट चक्क भाड्याने मिळते.
पुण्यात सध्या पाेलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर जाेरदार कारवाई करण्यात येत आहे. दिवसाला चार ते पाच हजार नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. पुण्याच्या शेजारीच असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये सध्या तरी हेल्मेट सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जे नागरिक कामानिमित्त पुण्यात येतात ते दापाेडीतील हाॅरिस पुलाजवळ असलेल्या राहुलराज या दुकानातून हेल्मेट भाड्याने घेतात. चेहऱ्या भाेवती अर्धे बसणाऱ्या हेल्मेट साठी 200 रुपेय डिपाॅझीट घेतले जाते तर चेहरा पूर्ण झाकणाऱ्या हेल्मेटसाठी 500 रुपये डिपाॅझीट घेतले जाते. तसेच या दाेन्ही हेल्मेटसाठी दिवसाला 10 रुपये इतके भाडे घेतले जाते. नागरिक पुण्याच्या हद्दीत प्रवेश करायचा असेल तर या दुकानातून हेल्मेट भाड्याने घेऊन पुण्याच्या हद्दीत प्रवेश करतात.
राहुल अंघाेळकर हे दुकान चालवतात. त्यांच्या वडीलांनी वीस वर्षापूर्वी हे दुकान सुरु केले हाेते. याच भागात सीएमई अर्थात काॅलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे. यात प्रवेश करताना हेल्मेट परिधान करने अनिवार्य आहे. त्यामुळे वीस वर्षापासून नागरिक मिलिटरीच्या भागात प्रवेश करण्यासाठी या दुकानातून हेल्मेट भाड्याने घेतात. पूर्वी राहुलचे वडील हे दुकान चालवित असत. ज्या ज्या वेळी हेल्मेट सक्ती झाली त्या त्या वेळी या दुकानात हेल्मेट भाड्याने घेण्यासाठी गर्दी झाली आहे. पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पाेलीस आयुक्त झाल्याने पिंपरी चिंचवड आता पुणे पाेलीस आयुक्तलयाच्या कक्षेत येत नाही. पुणे पाेलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सध्या हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये सध्या तरी अशी कुठली सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील लाेकांना पुण्यात जायचे असल्याच हेल्मेट घालणे आवश्यक आहे. जे लाेक राेज कामानिमित्त पुण्यात जातात त्यांनी स्वतःचे हेल्मेट खरेदी केले आहे. परंतु जे नागरिक कधीतरीच पुण्यात कामानिमित्त येतात ते आता या दुकानातून हेल्मेट भाड्याने घेत आहेत.
राेज साधारण 50 ते 60 लाेक हेल्मेट भाड्याने घेत आहेत. आधी केवळ सीएमईमध्ये जाणारे नागरिकच हेल्मेट भाड्याने घेत असत. परंतु पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर इतर लाेकही हेल्मेट भाड्याने घेत आहेत. या अनाेख्या उपक्रमामुळे हे दुकान या भागात प्रसिद्ध झाले आहे.