नव्या भारताची नवी आकांक्षा ‘मुद्रा योजना’, आतापर्यंत ८ कोटी लाभार्थ्यांना कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:20 PM2017-10-16T14:20:48+5:302017-10-16T15:12:45+5:30
मुद्रा योजनेद्वारे देशभरात ८ कोटी लाभार्थ्यांना ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती ‘मुद्रा प्रोत्साहन अभियान’ या कार्यक्रमात प्रकाश जावडेकर यांनी दिली.
पुणे : मुद्रा योजना ही नव्या भारताची नवी आकांक्षा असून या योजनेद्वारे देशभरात ८ कोटी लाभार्थ्यांना ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ४ कोटी नवउद्योजक असून ४ कोटी लोकांनी स्वत:च्या व्यवसायाला विस्तृत स्वरुप दिले आहे. केंद्र सरकारच्या नवनव्या योजना आणि पारदर्शी कारभारामुळे दलालांचा रोजगार गेला आहे. नोटाबंदी, जीएसटी, रेरा यासारख्या योजनांमधून पारदर्शीपणाची संस्कृती रुजत असल्याचे मत केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मुद्रा प्रोत्साहन अभियान’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, समाजकल्याण व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकिय संचालक रवींद्र मराठे, केंद्रिय वित्त सेवा विभागाचे उपसचिव अशोक कुमार डोग्रा, मुद्रा योजनेच्या समन्वयक आर. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, महाराष्ट्र बॅँकेचे आर. के. गुप्ता, के. एस. राऊत, दिनेश ढोके स्टेट बॅँकेच्या रश्मी दुग्गल आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, ‘मुद्रा योजनेमधून तारण बघून नाही तर कसब पाहून कर्ज दिले जात आहे. स्वाभिमानाने जगण्याची उमेद या योजनेमधून मिळाली आहे. समावेशक राजकारणाद्वारे सामाजिक सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षात देश बदलला असून पुढे जात आहे. १०९ कोटी मोबाईल ग्राहक झाले असून देशामध्ये मोबाईल उत्पादन करणा-या कंपन्यांची संख्या ३0 वरुन ५० वर गेली आहे. ११८ कोटी लोकांना आधार कार्ड मिळाले असून ३० कोटी नागरिकांनी जनधन खाते उघडले आहे. १६ कोटी नागरिकांनी पहिल्यांदाच १२ किंवा ३३० रुपयांचा विमा घेतला आहे. तर ६८ लाख लोकांनी अटल पेन्शन योजना घेतली आहे. १५ ते २० लाख नव्या नोक-या मिळाल्या आहेत. राज्यात ४२ हजार अनुसुचित जाती, जमाती आणि अल्पसंख्यांकांना योजनेद्वारे लाभ मिळाला आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळू शकणार नाही. त्यामुळे व्यवसायाकडे तरुणांनी वळावे. नागरिकांना सरळ सेवा मिळावी आणि दलाली बंद व्हावी हा शासनाचा उद्देश आहे. देशभरात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेले यश हे विकासाला मिळालेले यश आहे. बँकांनी नागरिकांना खेपा मारायला लावू नयेत. या योजनेचा प्रसार झाला असून प्रचार होण्याची आवश्यकता आहे.’
बापट म्हणाले, ‘मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी त्याला हातभार लावण्याची आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यात ७५६ कोटींपेक्षा अधिक कर्ज वाटप झालेले आहे. यापुर्वी तारणाशिवाय कर्ज दिले जात नसे, आता कारण पाहून कर्ज दिले जात आहे. व्यवसायामधून रोजगाराच्या संधी वाढत आहेत. जागा, भांडवल आणि वाहनाच्या व्यवसायात येणार्या अडचणी या योजनेमधून सुटत आहेत. योजनांसाठी मिळालेला सरकारी पैसा बुडवण्याची मानसिकता आजवर तयार करण्यात आली होती. मात्र, ही मानसिकता आता बदलावी लागेल. घेतलेले कर्ज परत केल्यास त्याचा लाभ अन्य लाभार्थ्यांना मिळू शकेल. शासकीय यंत्रणा, बँक आणि एनजीओमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने आणखी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रक्रिया अधिक सुटसुटीत करुन लोकांचे हेलपाटे कमी करण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा. ही योजना अधिक कार्यक्षम व यशस्वी करण्यासाठी बँकांचे प्रयत्न महत्वाचे आहेत.’
महापौर टिळक म्हणाल्या, ‘तरुण उद्योजकांना मुद्रा योजनेचा फार फायदा होत आहे. यामधून रोजगार निर्मिती आणि देशाची प्रगती साधणार आहे. महापौर बचत बाजार या वर्षी शहरात सात ठिकाणी सुरु केला. त्यामधून महिलांच्या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद मिळाला.’ तर शिरोळे म्हणाले, ‘प्रामाणिकपणाचा सन्मान हे शासनाचे ध्येय आहे. देशातील नागरिकांना भिक नको तर स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. भ्रष्टाचार संपविण्यासाठी पथदर्शी योजना आणल्या जात आहेत. यातून नव्या भारताचे स्वप्न साकार होणार आहे. सध्याचा काळ बुध्दीभ्रम करण्याचा आहे. विरोधक नागरिकांना भरकटवत आहेत.’ यावेळी मुद्रा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच, मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊन व्यवसाय उभ्या केलेल्यांच्या यशोगाथांची व्हिडीओ क्लिपही दाखविण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर टाकळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र बँकेचे महाप्रबंधक वसंत म्हस्के यांनी केले.