येरवडा कारागृहात उभारणार पीपीपी तत्त्वावर नवे कारागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:25+5:302021-07-14T04:15:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी तुरुंगात सध्या आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे पॅरोलवर सोडलेले कैदी परत ...

New jail to be set up in Yerawada Jail on PPP principle | येरवडा कारागृहात उभारणार पीपीपी तत्त्वावर नवे कारागृह

येरवडा कारागृहात उभारणार पीपीपी तत्त्वावर नवे कारागृह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : येरवडा कारागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी तुरुंगात सध्या आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे पॅरोलवर सोडलेले कैदी परत आले तर कैद्यांची संख्या क्षमतेच्या १८५ टक्के इतकी होईल. हे लक्षात घेत येरवडा कारागृहात पीपीपी तत्त्वावर नवीन कारागृह उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिली.

सुनील रामानंद यांनी सांगितले की, कोलकाता येथे अशाप्रकारे कारागृहाची उभारणी सुरू झाली आहे. राज्य शासनामार्फत सरकारी खर्चाने कारागृह उभारण्यास मर्यादा आहेत. याचे बांधकाम पोलीस हौसिंगमार्फतच होईल. शासनाशी संबंधित कंपनी करार करून त्यानुसार त्याचे बांधकाम होईल. या ठिकाणी ५ हजार कैद्यांना ठेवण्याची क्षमता तयार होऊ शकेल. याशिवाय हिंगोली, गोंदिया येथे नवीन कारागृहे उभारण्यात येत आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटले चालवावे

कोरोनामुळे आरोपींना न्यायालयात हजर करणे बंद झाले आहे. इतरवेळीही न्यायालयात तारखांना आरोपींना हजर करण्याचे प्रमाण ३८ टक्के इतके आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याचे कामकाज चालवावे. त्यात आरोपीला सहभागी होता येईल. वकिलांना उलट तपासणी घेता येऊ शकेल व हे आरोपी कारागृहातून खटल्यात उपस्थित राहू शकेल. सध्या खटले सुरू नसल्याने जवळपास २ हजार ९०० आरोपी कारागृहात आहेत. कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याचे रामानंद यांनी सांगितले. कारागृह प्रशासनाने कोरोनाचा यशस्वी मुकाबला केला असून, सध्या राज्यभरात केवळ ७३ कैदी व १० कर्मचारी सक्रिय रुग्ण आहेत.

........

वडापावपासून पुरणपोळीपर्यंत

कारागृहातील कैद्यांना त्यांचे नातेवाईक भेटीच्या वेळी अनेक वस्तू देत असतात; पण सध्या मुलाखतीचा कार्यक्रम बंद आहे. त्यामुळे कैद्यांसाठी कारागृहातील कॅटिंनमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, वस्तू उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कैदी दरमहा साडेचार हजार रुपये खर्च करू शकतात. कॅटिंनमध्ये वडापाव, जेलबी, पेठे बर्फी, गाईच्या तुपापासून अगदी पुरणपोळीपर्यंत सर्व प्रकारचे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Web Title: New jail to be set up in Yerawada Jail on PPP principle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.