टाळेबंदीचे अजून नवे नियम, विद्यार्थी, कामगारांना सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:12 AM2021-04-07T04:12:30+5:302021-04-07T04:12:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनापाठोपाठ महापालिकेने आदेश काढत शहरात संचारबंदी आणि शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत टाळेबंदी लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनापाठोपाठ महापालिकेने आदेश काढत शहरात संचारबंदी आणि शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत टाळेबंदी लागू करीत असल्याचे जाहीर केले. या टाळेबंदीतून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला असून, काही दुकानदारांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करून त्यांना दुकाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. उत्पादक कंपन्यांचे कामगार, दहावी-बारावी आणि स्पर्धापरीक्षा देणारे विद्यार्थी-उमेदवार, तसेच पूर्व नियोजित लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी (दि. ६) काढले.
राज्य शासनाच्या आदेशानंतर पालिकेने सोमवारी सायंकाळपासून सर्व खासगी आस्थापना, तसेच कार्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा, तसेच शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के संचारबंदी लागू करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. परंतु, या आदेशात काही बदल करण्यात आले असून, मंगळवारी सुधारित आदेश काढण्यात आले.
शुक्रवारी संध्याकाळपासून लागणाऱ्या दोन दिवसांच्या टाळेबंदीत पालिकेच्या हद्दीतील परीक्षार्थी विद्यार्थी घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत, तसेच तेथून पुन्हा घरापर्यंत प्रवास करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट बाळगणे मात्र आवश्यक आहे. ज्या औद्योगिक कंपन्यांचे कामकाज विविध शिफ्टमध्ये चालते, अशा कंपन्यांच्या कामगारांना या लॉकडाऊनच्या काळात प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यांनी कंपनीचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. पूर्वनियोजित लग्न समारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीचे बंधन कायम आहे. लग्न असलेल्या भागातील महापालिका अधिकारी, तसेच पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
नव्या आदेशाने हे सुरू राहणार
१. पेट्रोलपंप व पेट्रोलियम उत्पादने
२. सर्व प्रकारच्या कार्गो-कुरियर सेवा
३. शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा
४. अंडी-मांसाची दुकाने सुरू राहणार
५. पशू वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने उघडणार
६. शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणासाठी कामाच्या ठिकाणी जाण्यास मुभा
७. मेट्रो काम सुरू राहणार
८. सर्व प्रकारची खासगी वाहने, खासगी बससेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते सायकांळी ७ पर्यंत सुरू राहतील
९. बांधकाम व्यावसायिक साईट ऑफिस, आर्किटेक्ट ऑफिस.