नव्या लोणी कंद, लोणी काळभोर पोलीस ठाण्यांची वाढणार ‘ताकद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:13 AM2021-03-26T04:13:13+5:302021-03-26T04:13:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात नव्या समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर, लोणी कंद पोलीस ठाण्याला अधिक मनुष्यबळ, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात नव्या समाविष्ट झालेल्या लोणी काळभोर, लोणी कंद पोलीस ठाण्याला अधिक मनुष्यबळ, साधनसामग्री पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस व शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची एकत्रित बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी या पोलीस ठाण्यांना दररोज भेट देणार आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त स्वप्ना गोरे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, दोन्ही पोलीस ठाण्यांचे निरीक्षक व इतर अधिकाऱ्यांची गुुरुवारी (दि. २५) पोलीस आयुक्तालयात बैठक झाली.
लोणी काळभोर, लोणी कंद पोलीस ठाणे दोन दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाले आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्यांत सध्या ४९ आणि ३८ इतकी पोलिसांची संख्या आहे. शहर पोलीस दलातील ७ अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी या दोन्ही पोलीस ठाण्यांसाठी सध्या देण्यात आले आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत वाहतुकीची समस्या जटील आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग निर्माण करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेकडून त्या परिसरात वाहतूक पोलीस देण्यात येणार आहे. येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त हे दररोज या पोलीस ठाण्यांना भेट देणार असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
चौकट
शहरापेक्षा मोठे क्षेत्रफळ
नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढविणे आणि त्यांना वाहने पुरविण्याचे नियोजन करण्यात येत असून सध्या काही कर्मचारी दिले आहेत. येत्या काही दिवसात शहराप्रमाणेच त्या परिसरात टप्प्याटप्प्याने पोलिसांचे ‘पेट्रोलिंग’ सुरु होणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाचे सध्या जेवढे कार्यक्षेत्र आहे, त्याच्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ या दोन पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आहे. इतक्या मोठ्या भूभागावर शहराप्रमाणे ‘पोलिसिंग’ करण्यास नियोजन करावे लागणार आहे.