कोरोनाचे नवे स्वरुप ; प्रशासनावर मोठी जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:56+5:302020-12-27T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ब्रिटन देशातील नव्या स्वरुपातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव धोकादायक असल्याने प्रशासनाची जबाबदारी मोठी आहे. याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्रिटन देशातील नव्या स्वरुपातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव धोकादायक असल्याने प्रशासनाची जबाबदारी मोठी आहे. याला प्रभावीपणे आळा घालण्याचे नियोजन प्रशासनाने गंभीरपणे करावे अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
शनिवारी (दि. २६) पवार यांनी विधानभवनात येथे प्रशासकीय बैठक घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी बैठकीला उपस्थित होते.
पवार यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत विचारणा केली. अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजूंना आरोग्यसुविधा वेळेत मिळतील याबाबत दक्षता घ्यावी असे पवार यांनी सांगितले. बैठकीपुर्वी पवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध खासगी बँकांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कोरोना काळात केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. या बँकांनी केलेल्या कामाच्या ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.