नव्या महापौरांचा लंडन दौऱ्यावर जाण्यास नकार
By admin | Published: February 27, 2016 04:36 AM2016-02-27T04:36:21+5:302016-02-27T04:36:21+5:30
स्मार्ट सिटीसाठी होत असलेल्या महापालिका आयुक्त व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यात सहभागी होण्यास नवे महापौर प्रशांत जगताप यांनीही आज नकार दिला.
पुणे : स्मार्ट सिटीसाठी होत असलेल्या महापालिका आयुक्त व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यात सहभागी होण्यास नवे महापौर प्रशांत जगताप यांनीही आज नकार दिला. पुण्यासमोर अनेक प्रश्न आहेत, ते मला महत्त्वाचे वाटतात; मात्र माझा आयुक्तांनी जाण्यास विरोध नाही, त्यांचे कार्यक्रम पूर्वनियोजित आहेत, असे महापौरांनी सांगितले.
नगरविकास विभागाने आयुक्त कुणाल कुमार यांच्या या दौऱ्याला हरकत घेतली असल्याचा आरोप नगरसेवक संजय बालगुडे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यावर काहीही मत व्यक्त न करता, या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वत:च आज सांगितले. उद्या (शनिवार) रात्रीच ते मुंबईला रवाना होणार असून, २८ फेब्रुवारीला ते लंडनला जाणाऱ्या विमानात बसतील. त्यांच्या समवेत शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, उपायुक्त (विशेष) अनिल पवार हे पालिकेतील प्रमुख अधिकारीही त्यांच्या समवेत आहेत.
महापालिकेचे सन २०१६-१७चे अंदाजपत्रक स्थायी समितीकडून २९ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभेत सादर होत असून, त्याच्या आधीच म्हणजे २८ फेब्रुवारीला आयुक्त महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसमवेत लंडनला जात आहेत. हे योग्य नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा दौरा पुढे ढकलण्यास
सांगावे, अशी मागणी करणारे पत्र स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी महापौर जगताप यांना
दिले होते. पत्र मिळाले, मात्र आयुक्तांचा दौरा पूर्वनियोजित आहे, त्यामुळे आता त्यावर काही करता येणे शक्य नाही, असे महापौर जगताप यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)