शिक्षक घडविणारी नवी पद्धती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:09 AM2021-05-27T04:09:39+5:302021-05-27T04:09:39+5:30
या चार वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमांमध्ये बाल्यावस्थापूर्ण संगोपन शिक्षण, प्राथमिक व पूर्वप्राथमिक स्तरासाठी, माध्यमिक स्तरासाठी गणित व शास्त्र एकात्मिक ...
या चार वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमांमध्ये बाल्यावस्थापूर्ण संगोपन शिक्षण, प्राथमिक व पूर्वप्राथमिक स्तरासाठी, माध्यमिक स्तरासाठी गणित व शास्त्र एकात्मिक अध्यापक शिक्षण (बी.एस्सी.बी.एड), भाषा व सामाजिकशास्त्र एकात्मिक अध्यापक शिक्षण (बीए.बीएड.), व शारीरिक शिक्षण एकात्मिक अध्यापक शिक्षण (बीपीएड) या अभ्यासक्रमांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.
एकात्मिक अध्यापक शिक्षण अभ्यासक्रम बहुविद्याशाखीय महाविद्यालयांमध्ये म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये शिक्षणशास्त्र विभाग सुरू करून, या विभागांतर्गत सुरू करण्यात येतील. किंवा विद्यापीठांच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागांमध्ये सुरू करता येतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये सुरू करण्याविषयी सुचविले होते. परंतु, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने मे २०२१ मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये आता हे अभ्यासक्रम २०२२-२०२३ मध्ये सुरू करण्याविषयी ठरविले आहे. एकात्मिक अध्यापन शिक्षण अभ्यासक्रम म्हणजे ४ वर्षांचाच शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यालाच २०३० नंतर शिक्षक म्हणून सेवेत घेण्यात येईल, असे शैक्षणिक धोरण २०२० मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यमान शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये पदवीमध्ये विषयज्ञान (बीए, बीएस्सी अथवा १२वीमध्ये) उमेदवारास मिळाले, असे समजून बी.एड. अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व अध्यापन पद्धती शिकवली जाते. तसेच अध्यापनाचा सराव दिला जातो. परंतु, एकात्मिक चार वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये विषय ज्ञान, अध्यापनशास्त्राचे ज्ञान प्रत्येक सत्रामध्ये शिक्षकाच्या अध्यापक म्हणून क्षमता विकसित करण्यासाठी एकात्मिकरीत्या राबविला जातो. तसेच आठपैकी चार सत्रांमध्ये शाळांमध्ये प्रत्यक्ष शिकलेले वापरून अनुभव देण्यासाठी छात्रसेवाकाल सुचविण्यात आला आहे.त्यामुळे विषयज्ञान, अध्यापनशास्त्राचे ज्ञान व अध्यापकाची अंगी शिक्षक म्हणून अपेक्षित असल्याच्या क्षमता विकसित होण्यास मोठा कालावधी मिळत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात प्रायोगिक तत्त्वावर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यास विद्यार्थ्यांकडून आहे मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षक निर्मितीसाठी व शालेय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी एकात्मिक अध्यापक शिक्षण कार्यक्रम मोठी भूमिका पार पाडेल यात शंका नाही. त्यामुळे या अध्यापक शिक्षण कार्यक्रमाचे देशाच्या शिक्षणव्यवस्थेची गरज म्हणून स्वागत करणे आवश्यक आहे.
डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ