संगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 07:15 PM2020-01-23T19:15:34+5:302020-01-23T19:16:20+5:30
अभिजात संगीत पुढे न्यायचे असेल तर सातत्याने अधिकाधिक प्रयोग होणे गरजेचे
पुणे : आजच्या काळात वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली आहे. कार्यक्रमांमध्येही विविध वाद्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा पडदाही आता मोठा झाला पाहिजे. अभिजात संगीत पुढे न्यायचे असेल तर सातत्याने अधिकाधिक प्रयोग होणे गरजेचे आहे. संगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध युवा गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. शास्त्रीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महेश काळे 'इनफ्युजन' ही एक नवीन संकल्पना ते श्रोत्यांपुढे आणत आहेत. यानिमित्त गुरूवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संकल्पनेचे सादरीकरण सर्व प्रथम एनसीपीए ,मुंबई व त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे अनुक्रमे येत्या दि. १ व २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
शास्त्रीय संगीत हे केवळ विशिष्ट गटासाठीच असते, हा समज आपल्या अनेक चित्रपटांच्या संगीताला मिळणा-या लोकप्रियतेने मोडून काढला आहे. याचे कारण चित्रपट गीतांमधून वेगळ्या पद्धतीने त्याचे झालेले सादरीकरण. जर आपल्याला तरुण पिढीत शास्त्रीय संगीत रुजवायचे असेल तर त्यात सातत्याने प्रयोग व्हायला हवेत असे सांगून महेश काळे म्हणाले, ’कटयार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर श्रोत्यांची एक वेगळीच लाट समोर आली. ज्यात ज्येष्ठांपेक्षा तरुण रसिकांची संख्या जास्त होती. हे मला टिकवायचे आहे. या तरुणांनी शास्त्रीय संगीतात अधिकाधिक रस घ्यावा म्हणून काय करता येईल हा विचार सुरु झाला आणि मी काही प्रयोग करू लागलो. चित्रपटातील शास्त्रीय रागांवर आधारित प्रसिध्द गीते घेऊन त्यांची सरगम, सोपी मांडणी आणि सौंदर्य आकर्षकरीत्या मांडण्याचा प्रयत्न यामधून सुरु झाला. त्यासाठी मोठा वाद्यवृंद संगतीला आला. हा प्रयोग लोकांना फार आवडत आहे, हे लक्षात आल्यावर त्यावर अधिक विचार करून ही ‘इनफ्युजन’ संकल्पना घेऊन आता लोकांपर्यंत येत आहे.
जुन्या पिढीतील जाणकारांची अपेक्षापूर्ती करत असतानाच नव्या दमाच्या तरुण पिढीचे शास्त्रीय संगीताप्रती असलेले कुतूहल टिकविणे हेदेखील महत्वाचे आहे. हा कार्यक्रम नेमके याच दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचा गाभा हा शास्त्रीय संगीताचाच असणार आहे. यासाठी वाजणारा वाद्यवृंद हा हिंदुस्तानी व पाश्चात्य वाद्यांचा असेल. नवा साज लेवून आकर्षक पद्धतीने शास्त्रीय संगीत तरुणांना भावेल अशा स्वरुपात ते रसिकांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.