राष्ट्रपतींना नाही बडेजाव; त्यांची विनम्रता, संवेदनशीलता भावणारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 04:21 PM2022-07-22T16:21:22+5:302022-07-22T16:23:32+5:30
नवनिर्वाचित झालेल्या राष्ट्रपतींच्या आठवणी....
पिंपरी : आदिवासींच्या प्रश्नांसाठी सदैव आग्रही, विनम्र आणि कोणताही बडेजाव नसणाऱ्या; पण शांत, संयमी आणि संवदेनशील मनाचे व्यक्तिमत्त्व म्हणजेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होतं. त्यांच्यातील साच आणि मवाळपणा भावणारा आहे, असे सांगताहेत ओडिसा केडरमधील तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्यमान आयुक्त राजेश पाटील. ओडिसामधील मयूरभंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना तत्कालीन आमदार आणि नवनिर्वाचित झालेल्या राष्ट्रपतींच्या आठवणी सांगितल्या. त्यातून राष्ट्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.
मी २०१२ ते २०१६ या कालखंडात ओडिसामधील मयूरभंज जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होतो. साडेचार वर्षे या भागात मी होतो. या जिल्ह्यात २६ तालुके आहेत. या जिल्ह्याचा पूर्व भाग झारखंडची सीमा आणि दुसरीकडे रायरंगपूर शहराचा भाग येतो. रायरंगपूर विधानसभा क्षेत्रातील कुसुमी तालुक्यातून द्रौपदी मुर्मू या निवडून यायच्या. मी ज्यावेळी मयूरभंज जिल्ह्यात गेलो, त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यापूर्वीच्या राज्य मंत्रिमंडळात त्या मंत्री होत्या. मंत्री म्हणूनही त्यांनी चांगले काम केले.
राष्ट्रपती मुर्मू या ओडिसामधील संथाल या आदिवासी समाजातील. झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या भागात हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. मी ज्या जिल्ह्यात काम करीत होतो, तिथे ८० टक्के लोक हे आदिवासी समाजातील आहेत. या भागात संथाल लोक ओडिया आणि स्थानिक भाषाही बोलतात. या भागात गेल्यानंतर मीही ओडिया भाषा शिकून घेतली होती. त्यामुळे काम करणे सुलभ झाले. दोन वर्षांच्या कालखंडात एकदा-दोनदा प्रत्यक्ष आणि काही वेळा फोनवरून ओडिया भाषेतूनच त्यांच्याशी संवाद झाला. एकदा तर जिल्हाधिकारी मुख्यालयात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्या आदिवासी भागातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या होत्या. मतदारसंघाचा पालक म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट होती. विनंम्रताही होती. त्यावेळी त्यांचा साधेपणा भावला. अत्यंत साधी राहणी आणि मवाळ असे व्यक्तिमत्त्व. कोणताही बडेजाव नाही. अहंकार, अभिनिवेष नाही. त्यांनी मला भेटून आदिवासीच्या समस्या सांगितल्या होत्या.