कोरोनामुक्त रुग्णांसाठी नवी समस्या! बरे झालेल्यांना होतोय बुरशीजन्य आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:49 PM2021-05-05T16:49:45+5:302021-05-05T17:51:13+5:30
'म्युकोर्मायकॉसिस' पासून कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी डिस्चार्जपूर्वी तोंडाचा एक्सरे काढण्याची गरज
पुणे: पुण्यामध्ये सध्या 'म्युकोर्मायकॉसिस' आजार म्हणजेच चेहऱ्याच्या इन्द्रेनियांमध्ये सर्वप्रथम पसरणारी बुरशी अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांवर 'म्युकोर्मायकॉसिस' या बुरशीजन्य रोगाचा धोका वाढत असून त्यापासून कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डिस्चार्ज देण्यापूर्वी तोंडाचा एक्सरे पीएनएस काढा, असा महत्वपूर्ण सल्ला एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे मॅक्सिलोफेशियल विभागप्रमुख दंतशल्यचिकित्सक डॉ. जे. बी. गार्डे यांनी दिला आहे.
डॉ. गार्डे म्हणाले, 'पुण्यात विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये सुमारे एक हजार रुग्ण आढळले असून कोरोनानंतर या बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे. वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टी, यावर परिणाम होऊन काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे. सरकारने या संसर्गाची दखल घेऊन एस.ओ.पी. तयार केली पाहिजे.'
कोरोना रुग्णांना म्युकोर्मायकॉसिस वाचवण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असून फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सीलोफेशियल सर्जन (मुखशल्य चिकित्सक) नाक - कान- घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान -उपचार -पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात दंत शल्यचिकित्सक महत्वाचे योगदान देऊन रुग्णाचा प्राण वाचवू शकतात, असंही डॉ. गार्डे यांनी सांगितलं आहे.
म्युकोर्मायकॉसिस'ची बाधा कशी होते?
ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना या बुरशीची लागण होत नाही. परंतू अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, एडस् असणाऱ्यांना, तसेच स्टिरॉईडस्, सायक्लोस्पोरिन ही प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरणारी औषधे घेणाऱ्यांना हा आजार पटकन लक्ष्य बनवतो. दूषित मास्क, ऑक्सिजनच्या अस्वच्छ नळयातून बुरशीचे तंतू नाकातोंडात शिरकाव करु शकतो. व सायनसमध्ये ठाण मांडून बसतात. हवेतील बुरशीमुळेही संसर्ग होतो. तसेच कोरोनातून बरे होऊन जर घरी आले असाल तर घरातील कोणत्याही बुरशीजन्य पदार्थ, शिळे अन्न, फर्निचर किंवा पुस्तकांवरची धूळ यांपासून दूर राहा.
'म्युकोर्मायकॉसिस' ची लक्षणे
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये दात हलणे, दुखणं, पू येणे, फोड येणे, वास येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी येणे,डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी यामुळे काही जणांना आपला वरचा जबडा, डोळा देखील गमवावा लागला आहे. मृत्युचे प्रमाणही पन्नास टक्के इतके आहे. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. रुग्णाचे रोजचे ड्रेसिंग महत्वाचे आहे.
'म्युकोर्मायकॉसिस'वर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.
म्युकोर्मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. वेळेवर निदान, शास्त्रशुद्ध उपचार, पुनर्वसन तिन्ही टप्प्यात हे सर्व डॉक्टर यांचे योगदान महत्वाचे आहे.