Pune Metro: पुणे मेट्रोचा नवा विक्रम; पावणेतीन लाख जणांचा एकाच दिवशी प्रवास
By भाग्यश्री गिलडा | Published: September 15, 2024 05:51 PM2024-09-15T17:51:54+5:302024-09-15T17:52:39+5:30
विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांच्या सोईनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून सलग २४ तास पुणे मेट्रो धावणार
पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणेमेट्रोने प्रवाशांचा नवा विक्रम केला आहे. शनिवारी (दि. १४) एका दिवसात तब्बल २ लाख ७८ हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. पुणे मेट्रोच्या इतिहासात हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. गणेशोत्सवाला लाखो भाविक पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध देखावे बघण्यासाठी येतात. यंदाच्या वर्षी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू आहे. शनिवारी (दि. १४) सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल २ लाख ७८ हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. वनाज ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गावर प्रवाशांची वाहतूक सुमारे ६० टक्के होती तर पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय, रामवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यानच्या मार्गावरही प्रवाशांची गर्दी होती. शहराच्या मध्यभागात येण्यासाठी प्रवासी शिवाजीनगर न्यायालय, डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान या मेट्रो स्थानकांवर शनिवारी दुपारपासूनच गर्दी पाहायला मिळाली. मेट्रो प्रशासनाने गर्दी पाहता अतिरिक्त सेवा पुरवण्याची तयारी केली होती, त्यामुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही.
विसर्जनाच्या दिवशी मेट्रोची सेवा २४ तास सुरु राहणार
गणेशभक्तांसाठी पुणे मेट्रोने खास सोय केली आहे. विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा ही २४ तास सुरू राहणार आहे. यामुळे पुणेकरांना रात्रभर गणपती बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मेट्रो सेवा सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. प्रवाशांच्या सोईनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून सलग २४ तास पुणे मेट्रो धावणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे मेट्रो धावणार असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.