पुणे महापालिकेत नवा विक्रम : एकाच दिवशी १२५ सेवक निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 08:16 PM2018-06-01T20:16:40+5:302018-06-01T20:16:40+5:30
एकाच दिवशी एक, दोन प्रसंगी चार ते पाच कर्मचारी निवृत्त होण्याची वेळ महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेवर अनेकदा येते. पण पुणे महापालिकेने मात्र नवा विक्रम प्रस्थापित केला असून एकाच दिवशी महापालिकेतले १२५ सेवक निवृत्त झाल्याचे दृश्य गुरुवारी बघायला मिळाले.
पुणे : एकाच दिवशी एक, दोन प्रसंगी चार ते पाच कर्मचारी निवृत्त होण्याची वेळ महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेवर अनेकदा येते. पण पुणे महापालिकेने मात्र नवा विक्रम प्रस्थापित केला असून एकाच दिवशी महापालिकेतले १२५ सेवक निवृत्त झाल्याचे दृश्य गुरुवारी बघायला मिळाले.
काही वर्षांपूर्वी ज्ञानाच्या अभावामुळे अनेकदा मूळ जन्मतारीख लक्षात ठेवली जायची नाही. त्याचा वापरही आतासारखा दाखल किंवा आधार कार्ड किंवा रिपोर्ट लिहिण्यासाठी केला जात नसे. त्यामुळे अनेकदा जन्मतारखेसारख्या महत्वाच्या मुद्द्याला फारसे महत्व नसायचे. मात्र शाळेत प्रवेश घेताना तारीख आणि वय टाकणे बंधनकारक असल्याने अडचण निर्माण होत असे. अशावेळी अनेकदा नव्या शैक्षणिक वर्षाची एक जूनतारीख टाकली जात असे. याचाच परिणाम म्हणजे प्रत्येक कार्यालयात मोठ्या संख्येने ३१ मे रोजी निवृत्त होणारे कर्मचारी असतात. पुणे महापालिकेतही हा अनुभव दरवर्षी येत असून यंदा निवृत्तीच्या संख्येने शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला.
एखाद्या संस्थेतून ३५, ४० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होणे ही ठरलेली गोष्ट आहे. मात्र तुम्ही सर्वजण सेवेतून निवृत्त झाला आहात, कामातून नाही, त्यामुळे पुढेही काम सुरू ठेवा, समाजकार्यात झोकून द्या, आपली आवड, छंद जोपासा असा सल्ला ज्येष्ठ उद्योगपती अरूण फिरोदिया यांनी यावेळी दिला.आयुष्यातील तीस वर्षांपेक्षा जास्त काळ महापालिकेत काढलेल्या या कर्मचाऱ्यांचा गळा यावेळी दाटून आला होता. महापालिका ही इमारत नाही तर आमच्या आयुष्याचा भाग बनल्याचे मतही अनेकांनी यावेळी व्यक्त केले. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक गोपाळ चिंतल, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर या वेळी उपस्थित होते.