पुणे जिल्ह्यात पिकतोय हार्ट अटॅक पासून वाचवणारा 'निळाकाळा भात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 04:21 PM2021-10-18T16:21:17+5:302021-10-18T16:34:58+5:30

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पारंपरिक भात शेतीची लागवड केली जाते. मात्र, यंदा आसाम आणि इंडोनेशियातून घेतल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड तालुक्याच्या आदिवासी भागात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.

New rice is being grown in ambegaon taluka | पुणे जिल्ह्यात पिकतोय हार्ट अटॅक पासून वाचवणारा 'निळाकाळा भात'

पुणे जिल्ह्यात पिकतोय हार्ट अटॅक पासून वाचवणारा 'निळाकाळा भात'

Next
ठळक मुद्देआंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पहिलाच प्रयोग निळसर काळ्या रंगाच्या भात लोंब्या शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पारंपरिक भात शेतीची लागवड केली जाते. मात्र, यंदा आसाम आणि इंडोनेशियातून घेतल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड तालुक्याच्या आदिवासी भागात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. सध्या या भातपिकाच्या लोंब्या लगडल्या आहेत. निळसर काळ्या रंगाच्या भात लोंब्या शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. कृषी विभागाच्या पुढाकाराने या भाताची लागवड करण्यात आली असून, या प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.

निळ्या भातामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि अँथोसायनिन असतात. सध्या निळ्या तांदळाविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. निळा तांदूळ पांढऱ्या तांदळापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. निळ्या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. याशिवाय निळा तांदूळ बऱ्याच रोगांवरही फायदेशीर ठरतो, तसेच त्यामध्ये अँन्थोसायनिन असल्याने हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. एवढेच नव्हे, तर ते आपल्याला हार्ट अटॅकपासून देखील वाचवते.

निळ्या भाताची लागवड भारतात फारच कमी प्रमाणात केली जाते. भारतीय बाजारपेठेत निळ्या तांदळाचा भाव २५० रुपये प्रतिकिलोपासून सुरू होतो. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात शेतकऱ्यांनी २० गुंठे क्षेत्रात या निळ्या भाताची लागवड केली आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या ओंब्या आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. संपूर्ण शेत काळ्या ओंब्यांनी बहरले आहे. निळ्या भाताचे उत्पादन ११० दिवसांत घेतले जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य होणार आहे. शेतातील धानाच्या लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास फुलवडे येथील माजी पोलीस पाटील, तसेच पुणे जिल्ह्यातून भात शेतीत प्रथम क्रमांक मिळविलेले प्रगतशील शेतकरी गंगाराम लिंबाजी हिले यांनी व्यक्त केला.

कॅन्सरसह विविध आजारांसाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले

निळा तांदूळ वजन कमी करण्यात खूप उपयुक्त आहे. कारण पांढऱ्या तांदळापेक्षा यात चरबी कमी आहे. निळ्या भातामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट यकृत निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हे यकृतातील हानिकारक पदार्थांचे डिटॉक्स करते. निळ्या भातामध्ये सापडलेला अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित करतो. १०० ग्रॅम निळ्या भातामध्ये साधारणपणे ४:५ ग्रॅम फायबर असते जे आपले पचन अधिक चांगले राखण्यास मदत करते. याशिवाय ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारांसाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

Web Title: New rice is being grown in ambegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.