एकीकडे नाराजी दुसरीकडे नवे चिन्ह; म्हणून मित्रपक्षांच्या मदतीवर भिस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:03 AM2024-05-10T10:03:37+5:302024-05-10T10:04:01+5:30
श्रीरंग बारणे-संजोग वाघेरे पाटील लढतीकडे सर्वांचे लक्ष
श्रीनिवास नागे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पुणे आणि रायगड जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात कडवा सामना होत आहे. मतदारसंघाच्या निर्मितीनंतर तिन्ही निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारली असली, तरी पक्षातील फुटीनंतर समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत दोन्ही गटांची भिस्त मित्रपक्षांच्या मदतीवर आहे.
पुण्याजवळील सांगवी-दापोडीपासून मुंबईजवळच्या घारापुरी लेण्यांपर्यंतचे क्षेत्र मावळ मतदारसंघात आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली, तेव्हा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत होते. मात्र, पक्षातील अंतर्गत कुरघोड्या आणि गावकी-भावकीच्या राजकारणामुळे तिन्ही वेळा राष्ट्रवादीला शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला.
महायुतीतून शिंदेसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा रिंगणात असून, मतदारसंघातील सर्व सहा आमदार महायुतीचे आहेत. त्यांची हॅट्ट्रिक चुकवण्यासाठी महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
भावकी-गावकीचे राजकारण
n आतापर्यंत घाटावरील भागाचा नेहमीच वरचष्मा राहिल्यामुळे दोन्ही प्रबळ उमेदवार घाटावरील पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत.
n भावकी-गावकीच्या राजकारणामुळे हा परिसर बाहेरच्या उमेदवारांना सहसा स्वीकारत नाही. दोन्ही उमेदवारांची या परिसरात नातीगोती असून, दीर्घ राजकीय पार्श्वभूमीही आहे.
या प्रश्नांचे काय?
n रेडझोन आणि पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे.
n पिंपरी-चिंचवड शहराला होणारा अपुरा, अनियमित पाणीपुरवठा.
n पुणे ते लोणावळा रेल्वेमार्गाचे रखडलेले चौपदरीकरण.
n पवना धरणग्रस्तांचा मोबदला आणि परतावा, घाटाखालील आदिवासी पट्ट्यातील पाणीप्रश्न.
n कर्जत-पनवेल परिसरातील बंद पडलेल्या कंपन्यांतील कामगारांपुढे आलेली बेरोजगारी हे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
बारणेंना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बळ असले, तरी मागील वेळी त्यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केल्याने राष्ट्रवादीचा तो गट आता मदत करणार का?
काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद तोकडी असली तरी रायगड जिल्ह्यातील शेकापची ताकद आणि मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती वाघेरेंच्या पाठीशी.
प्रस्थापितांविरोधात असलेल्या नैसर्गिक नाराजीचा सामना करण्याची बारणेंना चिंता,
तर नवा चेहरा आणि नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे वाघेरेंपुढे आव्हान.
२०१९ मध्ये काय घडले?
श्रीरंग बारणे (शिवसेना) ७,२०,६६३
पार्थ पवार (राष्ट्रवादी) ५,०४,७५०
राजाराम पाटील (वं.ब.आ.) ७५,९०४
नोटा १५,७७९