...रोज नवा जावई इथे, रोज नवा सासरा! रामदास फुटाणे यांचे फटकारे : संवाद, पुणेतर्फे अक्षरसेवा पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:14+5:302021-07-22T04:08:14+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार सोहळा पार पडला. त्या वेळी फुटाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यावेळी उपस्थित होते.
विनोद शिरसाट (साधना, बालकुमार दिवाळी अंक), किरण केंद्रे (किशोर मासिक, बालभारती), डॉ. गीताली टिळक (छावा मासिक), श्रुती पानसे (चिकूपिकू मासिक), सुनिता जोगळेकर (निर्मळ रानवारा मासिक) यांचा अक्षरसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिरसाट यांच्या वतीने गोपाळ नेवे, टिळक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वप्निल पोरे तर जोगळेकर यांच्या वतीने ज्योती जोशी व स्नेहल मसालिया यांनी पुरकार स्वीकारला. पुण्यातील बालवाचनालय चालवणा-या संस्थांना या निमित्ताने पुस्तके (अक्षरभेट) भेट देण्यात आली. यात प्रसाद भडसावळे, निरजा जोशी, नरहरी पाटील यांचा समावेश होता.
प्रशांत जगताप म्हणाले, ‘बालसाहित्याने मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले. मात्र गेल्या काही वर्षात सोशल मीडियाने सगळे चित्र बदलले आहे. मुले मुले मैदानात दिसणे आवश्यक असताना मोबाईलच्या आहारी गेली आहेत, पुस्तकांपासून दुरावली आहेत. मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी पालकांनी मोबाईल हातात दिला. आता मुलांच्या चुकीच्या छंदाची किंमत मोजावी लागत आहे. अशा काळात बालसाहित्य चळवळ भक्कम रीतीने रुजण्याची गरज आहे. वाचनसंस्कृती टिकवणारी माणसे समाजात आहेत. पुस्तके माणसाचे आयुष्य बदलतात. डिजिटल युगात लोक अडकून पडले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्याचे काम पुस्तकेच करू शकतात.' प्रसाद भडसावळे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्रुती पानसे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद बालवडकर यांनी आभार मानले.
----------------
‘समाजात जातिद्वेष, धर्मांधता वाढली आहे. समाजाला विकृत वळण लागत आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांवर खूप मोठी जबाबदारी आहे. साहित्यिकांनी दुर्लक्ष केले तर भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतील. म्हणूनच बालसाहित्य समृध्द होण्याची गरज आहे. मुलांना काय स्वीकारावे आणि नाकारावे याचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य पुस्तक देते. वाचनातून मुलांची कार्यक्षमता वाढते.
- रामदास फुटाणे
------------------------
मुले आणि बालसाहित्य सर्वात दुर्लक्षित घटक आहेत. त्यांनी वाचले नाही तर भविष्यातले वाचक तयार होणार नाहीत. लहानपणापासून वाचनाची पेरणी महत्वाची असते. पुस्तकांअभावी भरलेल्या घरात मुले अनाथ असतात. हे चित्र बदलण्यासाठी प्रचंड काम करावे लागणार आहे. प्रयत्न कायम राहिले तर बालसाहित्य समृद्ध होईल. कोरोनाने मुलांच्या भावविश्वात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी पुस्तकेच मदत करतील.
- किरण केंद्रे, संपादक, किशोर मासिक
------------------------------