प्रवीण गेडाम राज्याचे नवे कृषी आयुक्त; ११ महिन्यातच चव्हाण यांची बदली, कार्यकाळही अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:31 AM2023-10-20T10:31:07+5:302023-10-20T10:31:16+5:30
प्रशासनावर पकड ठेवणारे प्रशासकीय अधिकारी, अशी प्रवीण गेडाम यांची ओळख
पुणे: राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली झाली असून, नवे कृषी आयुक्त म्हणून प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांनी अकरा महिन्यांपूर्वीच या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली आहे. गेडाम हे शुक्रवारी (दि.२०) पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. प्रशासनावर पकड ठेवणारे प्रशासकीय अधिकारी, अशी गेडाम यांची ओळख आहे. त्यामुळे कृषी विभागाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
चव्हाण यांची मृद व संधारण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने तसा आदेश गुरुवारी काढला. या पदावर एकनाथ डवले कार्यरत होते. डवले यांची अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही. गेडाम हे नुकतेच अध्ययन रजेवरून राज्य सरकारच्या सेवेत परत आले आहेत. गेडाम हे मूळचे नागपूर येथील असून, ते एमबीबीएस डॉक्टर आहेत. जळगाव महापालिकेचे आयुक्त, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर धाराशिव, सोलापूर येथील जिल्हाधिकारी, तसेच नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. परिवहन विभागाचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते.