VIDEO | मिरवणूक नवरदेवाची नाही तर विद्यार्थ्यांची! शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:46 PM2022-06-15T12:46:43+5:302022-06-15T13:17:51+5:30
रेटवडी सतारकावस्तीची जिल्हा परिषद शाळा...
राजगुरूनगर: रेटवडी (ता. खेड ) सतारकावस्ती येथील जिल्हा परिषद शाळेने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे जंगी स्वागत केले. नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीत बसवून ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते.
राज्यातील अनेक शाळा दि. १५ बुधवारी सुरु झाल्या. अनेक छोट्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा आज श्रीगणेशा झाला. शाळेत मुलाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. तालुक्याच्या पूर्व भागातील रेटवडी येथील सतारकावस्तीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यामुळे चिमुकले विद्यार्थी आंनदित झाले होते.
प्रवेशोत्सव! ZP च्या शाळेमधील चिमुकल्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक#pune#maharashtrapic.twitter.com/SHlcB9rHcT
— Lokmat (@lokmat) June 15, 2022
शाळा आवारात रांगोळी काढून विद्यार्थ्याचे औक्षण करून गुलाबपुष्प देण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके देऊन खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोपान मांजरे, शिक्षक मुगुटराव मोरे, पांडुरंग देवडे, नंदकुमार वाघमारे, बाळासाहेब जाधव, प्रणोती गावडे, अनिता वाळूंज, गणेश चक्कर, सुवर्णा गाडीलकर, प्राजक्ता नेटके, अस्मिता सांडभोर, स्मिता शिंदे, रेटवडीच्या सरपंच माया थिटे, शालेय समिती अध्यक्ष सुनिल वाबळे, विलास पवार, संजय हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते.