पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल प्रतीक्षेतच; जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:45 AM2024-05-15T10:45:14+5:302024-05-15T10:45:54+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुतकेच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च महिन्यात झाले....
पुणे :पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुढील महिन्यात जुन्या टर्मिनलच्या विकासाचे काम सुरू केले जाणार आहे. या टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर जुने आणि नवीन टर्मिनल जोडले जाणार असल्यामुळे विमानतळाची प्रवासी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुतकेच नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च महिन्यात झाले. त्यानंतर विमान कंपन्यांचे साहित्य नवीन टर्मिनलमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे. तसेच, नवीन टर्मिनल सुरू करण्यासाठी नागरी सुरक्षा उड्डाण ब्यूरोकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. तसेच, सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान अद्याप मिळालेले नाहीत. परवानगी आणि जवान मिळाल्यानंतर नवीन टर्मिनल सुरू केले जाणार आहे.
साधारण पुढील महिन्यात नवीन टर्मिनल सुरू केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुन्या टर्मिनलच्या विकासाला सुरुवात केली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नवीन व जुनी इमारत जोडली जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२५ पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.