पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल वर्षांत प्रवाशांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:25+5:302021-09-02T04:21:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विमानतळावर सुरू असलेले नवे टर्मिनल बांधण्याचे काम ६१ टक्के पूर्ण झाले असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विमानतळावर सुरू असलेले नवे टर्मिनल बांधण्याचे काम ६१ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ३५८.८९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत १६२.७९ कोटी रुपये खर्च झाले आहे. हे टर्मिनल अत्याधुनिक असेल, शिवाय ५ लाख चौरस फूट इतक्या मोठ्या क्षेत्रावर उभारले जाईल. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होणार नाही.
मंगळवारी पुणे विमानतळ येथे खासदार तथा विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी कामाचा आढावा घेताना विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
दिवसेंदिवस पुणे शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत ही वाढ होत आहे. हे लक्षात घेत २०१८ सालापासून विमानतळ विस्तारित करण्याचे काम सुरू आहे.
नवे टर्मिनल बांधताना प्रवासी सुविधांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. शिवाय हे टर्मिनल इंटिग्रेटेड असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आताच्या टर्मिनलमधून सहजतेने जाता येईल. टर्मिनल पूर्णत: वातानुकूलित असेल. प्रतिवर्षी १ कोटी ९० लाख प्रवाशांना सामावण्याची त्याची क्षमता असेल. यात गर्दीच्या वेळी २ हजार ३०० प्रवाशांना (१ हजार ७००, देशांतर्गत आणि ६०० आंतरराष्ट्रीय) सेवा देता येईल. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे ५ नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज), ८ स्वयंचलित जिने (एस्केलेटर), १५ लिफ्ट, ३४ चेक-इन काउंटर, प्रवासी सामान वहन यंत्रणा, आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्टसह आदी अद्ययावत सुविधा इमारतीत असतील.
नवे टर्मिनल हे पर्यावरण अनुकूल असेल. त्यात खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी ३६ हजार चौरस फूट दिली जाणार आहे. याबरोबर पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था तसेच सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे असतील. पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारी त्याची रचना असेल.
विमानतळावर पार्किंगचीदेखील समस्या दूर होणार आहे. येथे चारमजली पार्किंग बांधण्यात येत आहे. त्यासाठी १२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एका वेळी १०२४ वाहनांचे पार्किंग करता येईल. नव्या इमारतींमध्ये प्रवाशांचे मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी देखील १५ हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील प्रवाशांना अनुकूल असे हे नवे टर्मिनल असेल.
कोट ----
सध्याच्या विमानतळावरील टर्मिनल केवळ २२ हजार चौरस मीटर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी जागा अपुरी पडत. त्यामुळे प्रवासी व विमान कंपन्याची गैरसोय होत. नवे टर्मिनल मोठे आहे. वर्षाला १ कोटी ९० लाख प्रवासी क्षमता आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज टर्मिनलची गरज होती. ती आता पूर्ण होईल.
- खा. गिरीश बापट