पीएमपीकडून नवी पर्यटन बससेवा! सुट्टीत एसी बसमधून पाहुण्यांना पुणे दर्शन घडवा मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 02:14 PM2024-12-04T14:14:57+5:302024-12-04T14:15:35+5:30
३३ प्रवाशांनी ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरात तब्बल १०० टक्के सवलत देण्यात येणार
पुणे: पुण्याच्या पर्यटनाला चालना मिळावी आणि पीएमपीएमएल बससेवाही लोकांच्या पसंतीस उतरावी, यासाठी पीएमपीएमएलने गेल्यावर्षीपासून ‘पुणेपर्यटन’ ही बससेवा सुरू केली आहे. तसेच दिवाळीत देण्यात आलेल्या पर्यटन सेवेला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून आता प्रशासनाने नव्या योजना अमलात आणल्या आहेत. त्यात ३३ प्रवाशांनी ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरात तब्बल १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
पुण्यातील पर्यटनासाठी स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बसेसची सेवा सुरू केली आहे. इलेक्ट्रिक बसमुळे पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळणार असून, इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांना अत्यंत आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. याशिवाय वायू प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधन खर्चातही बचत होणार आहे. पुणेकरांकडे येणाऱ्या पाहुण्यांना पुण्याचे पर्यटन घडवून आणण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ची ही सेवा सोयीची ठरणार आहे. आठवड्याच्या सुट्टीसह शनिवार-रविवारी ही सेवा असणार आहे; मात्र विशेष मागणी आणि बुकिंग असेल तर इतर दिवशीही ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुण्याच्या पर्यटन बससेवेबाबत माहिती देताना पीएमपीएमएलचे समन्वयक नितीन गुरव म्हणाले की, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पर्यटन बससेवेमध्ये ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरात १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. काही कारणास्तव बुकिंगच्या दिवशी बससेवा रद्द झाल्यास त्यांना पुढच्या शनिवारी त्याच तिकिटावर प्रवास करता येणार आहे. याशिवाय त्याच तिकिटावर तुम्हाला त्या दिवशी पर्यटन बस थांब्यापासून तुमच्या घरापर्यंत इतर बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. अर्थात घरापर्यंत जाणाऱ्या इतर बसमध्ये पर्यटन बसचे तिकीट प्रवासासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. विशेष म्हणजे, सर्व पर्यटन बसमध्ये खास पर्यटन मार्गदर्शक व्यक्ती उपलब्ध करण्यात येणार असून, त्यांच्याकडून पर्यटनस्थळाविषयी प्रवाशांना माहिती सांगितली जाणार आहे.
या ठिकाणाहून पर्यटन बससेवा :
बस क्रमांक १) मार्ग हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर
बस क्रमांक २) मार्ग हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कौढणपूर मंदिर, हडपसर,
बस क्रमांक ३) मार्ग डेक्कन, फ्रेंडशिप गार्डन खारावडे म्हसोबा देवस्थान, नीळकंठेश्वर पायथा, झपूर्झा संग्रहालय, डेक्कन
बस क्रमांक ४) मार्ग - पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड पायथा, पुणे स्टेशन.
बस क्रमांक ५) मार्ग - पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन,
बस क्रमांक ६) मार्ग - पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई मंदिर, छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती, भीमा-कोरेगाव विजय रणस्तंभ, पुणे स्टेशन.
बस क्रमांक ७) मार्ग - भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती-शक्ती निगडी.
बस क्रमांक ८)मार्ग - पुणे स्टेशन-डेक्कन जिमखाना, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, इस्कॉन मंदिर कोंढवा रोड, शिवसृष्टी आंबेगाव, स्वामी नारायण मंदिर नऱ्हे-आंबेगाव, पुणे स्टेशन.
प्रत्येक ८ मार्गावरून शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी बस सकाळी ९ वाजता सुटणार असून प्रत्येक प्रवासी तिकीट दर ५०० रुपये आहे.