आंबेगाव विधानसभेत नवा ट्विस्ट; 'मविआ' कडून इच्छुक निकम यांचा प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:48 PM2024-10-18T13:48:42+5:302024-10-18T13:49:30+5:30

प्रतिस्पर्धी रमेश येवले यांनी महाविकास आघाडीकडून तिकीट ना मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी ठेवल्याने निकम यांना असाही फटका बसण्याची शक्यता

New twist in Ambegaon Assembly Aspirant devdatta nikam from mahavikas aghadi in the election arena | आंबेगाव विधानसभेत नवा ट्विस्ट; 'मविआ' कडून इच्छुक निकम यांचा प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात

आंबेगाव विधानसभेत नवा ट्विस्ट; 'मविआ' कडून इच्छुक निकम यांचा प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात

पुणे : आंबेगावविधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट तयार झाला आहेत. आतापर्यंत केवळ दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी देवदत्त निकम, असे चित्र पाहायला मिळत होते; पण आता देवदत्त निकम यांचाही प्रतिस्पर्धी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. उद्योजक रमेश येवले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्यास वेळप्रसंगी अपक्ष उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकम समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची होणारी निवडणूक चुरशीची होणार आहे. मागील सात निवडणुकांमध्ये चढत्या मताधिक्याने विजयी झालेले दिलीप वळसे-पाटील सलग आठव्यांदा विधानसभा लढवणार आहेत. महायुतीचे पाठबळ त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी सभापती देवदत्त निकम तीव्र इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाच निकम यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले होते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी डावल्यानंतर ते अपक्ष उभे राहून विजयी झाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर निकम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी सुरुवातीपासून पावले टाकली आहेत. 

निकम यांना पक्षातून उमेदवारीसाठी कोणताही स्पर्धक नव्हता. मात्र, दीड महिन्यापूर्वी उद्योजक रमेश येवले यांनी अचानक एन्ट्री घेतली आणि तालुक्यात खळबळ उडवून दिली. येवले शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी मुलाखतसुद्धा दिली आहे. दीड महिन्यात येवले यांनी केलेले वातावरण पाहून निकम गटात खळबळ उडाली आहे. जर पक्षाने उमेदवारी दिली तर नेटाने लढू अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी रमेश येवले यांनी ठेवली आहे. त्यामुळे येवले यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका देवदत्त निकम यांना बसण्याची शक्यता आहे. मत विभागणी झाली तर निश्चितच त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे. त्यामुळे निकम यांनी बांधलेल्या अडाख्यांना तडा गेला आहे. जेव्हापासून येवले मैदानात उतरले आहे तेव्हापासून निकम कैसे बॅक फूटवर गेल्याचे दिसते. विशेष म्हणजे त्यांनी या संदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिलेली नाही. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष तसेच बाजार समितीचे सभापती असताना देवदत्त निकम यांच्या स्वभावाची अनेकांना प्रचिती आली आहे. सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांमध्ये निकम यांच्या स्वभावाने नाराजी वाढली होती त्याचाही फटका त्यांना निवडणुकीत बसू शकतो. एकूणच आगामी विधानसभा निवडणूक निकम यांना काहीशी जड जाईल, अशी चर्चा आंबेगाव तालुक्यात होताना दिसते. अर्थात त्यासाठी निकम यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी त्यांनी गावोगावी फलक लावून तसेच सूचितही केले होते. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठीही निकम यांना झगडावे लागणार आहे.

Web Title: New twist in Ambegaon Assembly Aspirant devdatta nikam from mahavikas aghadi in the election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.