HMPV Virus: नवा व्हायरस, घाबरू नका; सतर्क राहा! राज्यातील जिल्हा रुग्णालये सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:13 IST2025-01-07T10:13:18+5:302025-01-07T10:13:57+5:30
एचएमपीव्ही या आजारात सर्दी, खोकला, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

HMPV Virus: नवा व्हायरस, घाबरू नका; सतर्क राहा! राज्यातील जिल्हा रुग्णालये सतर्क
पुणे: चीनमध्ये मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) या श्वसनासंबंधी आजाराचा उद्रेक झाला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हा रुग्णालयांना यासंबंधी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यातील धोका ओळखून सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागपूरमध्ये सध्या २ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
मेटाप्युमोव्हायरस यापूर्वी २००१ मध्ये आढळून आला आहे. त्यामुळे हा आजार नवा नसून, जुना असल्याचे बोलले जात आहे. परंतु, सध्या बंगळुरूमधील आठ महिन्यांच्या बालकाला मानवी मेटाप्युमोव्हायरसची लागण झाल्याचा संशय पीटीआयने दिले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्यसेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी निवेदनाद्वारे केले आहे. ते म्हणाले की, चीनमध्ये आढळलेला विषाणू हा श्वसनाच्या विषाणूसारखा आहे. ज्यामुळे सामान्यपणे सर्दी होते. यामुळे वृद्ध आणि अगदी लहान मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यांनी लोकांना श्वासोच्छ्वासाच्या आजारांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. लोकांना घाबरण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालय देशभरातील श्वसन संसर्गांच्या पसरण्यावर आणि ऋतुबद्ध इन्फ्लूएंझा ट्रेंड्सवर सक्रियपणे लक्ष ठेवत आहे. देशातील कोणत्याही संस्थेकडून मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली गेली नाहीत, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
एचएमपीव्ही काय आहे?
-एचएमपीव्ही एक श्वसनासंबंधी व्हायरस आहे.
-जो मुख्यत: श्वसन मार्गावर परिणाम करतो.
-या व्हायरसला मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही असे म्हटले जाते.
-सर्दी, खोकला, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
-एचएमपीव्ही संसर्ग लहान मुले आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो.
-या व्हायरसमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते.
या गोष्टी करा
-साबणाने वारंवार हात धुवा. सतत खोकला येत असेल तर तोंडाला रुमाल लावा.
-ताप, सर्दी झाली असेल तर गर्दीमध्ये जाऊ नका.
-संतुलित आहार घ्या.
-दिवसभर भरपूर पाणी प्या.