पुणे जिल्ह्याातील नवीन मतदारांना लवकरच मिळणार घरपोच रंगीत ओळखपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:35 PM2019-03-15T12:35:43+5:302019-03-15T12:43:06+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला.
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत तब्बल २ लाख ८८८ नवीन मतदारांनी नोंदणी केली असून या सर्व मतदारांना लवकरच रंगीत ओळखपत्राचे वितरण करण्यात येणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशातील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक भक्कम करणे गरजेचे आहे. शासनाकडून व विविध स्वयंसेवी संस्थांकडून निवडणूकीबाबत जागृती करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस नव मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात नव मतदारांची संख्या दोन लाखाहून अधिक झाली आहे. या नव मतदारांचे स्मार्ट रंगीत ओळखपत्र नुकतेच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) ओळखपत्र दिले जातील, असेही मोनिका सिंह म्हणाल्या.
मतदार यादी प्रसिध्द झाली असली तरी सर्वच मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाही.काही मतदारांना या पूर्वी झालेल्या मतदार नोंदणीनंतर ओळखपत्रच देण्यात आली नाहीत.त्यामुळे या लोकसभा निवडणूक काळात तरी ओळखपत्र मिळणार का? असा प्रश्न अनेक मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. परंतु, जुन्या मतदारांना ओळखपत्रांचे वितरण केले जाणार नाही.तर केवळ नवमतदारांनाच ओळखपत्र देण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात मतदार ओळखपत्रांचे वाटप सुरू होईल.परंतु,घरपोच मतदार ओळखपत्र मिळाले नाही अशा मतदारांनी मतदान नोंदणी केंद्रावर जावून स्वत: ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही आवाहन मोनिका सिंह यांनी केले आहे.