ऑक्टोबरपर्यंत नव मतदारांनी नोंदणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:22+5:302021-09-17T04:14:22+5:30
बारामती: भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, नव मतदारांनी नोंदणी करून घ्यावी ...
बारामती: भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, नव मतदारांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
तहसील कार्यालय बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तहसीलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसीलदार पी. डी. शिंदे उपस्थित होते. या वेळी प्रांताधिकारी कांबळे यांनी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे व योग्य प्रकारे विभाग /भाग तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कोरेाना प्रादुर्भावामुळे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मतदारांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर व वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये सुविधा उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार नाव नोंदणीसाठी वोटर हेल्पलाईन ॲप, मोबाईल ॲप विकसित केले आहे त्या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच गावोगावी सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या सहाय्याने ॲप डाऊनलोड करण्याविषयी माहिती देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.