पिंपरी सांडस येथे नवा कचरा प्रकल्प
By admin | Published: June 1, 2017 01:42 AM2017-06-01T01:42:45+5:302017-06-01T01:42:45+5:30
उरुळी देवाची येथून हलवण्यात येणारा पुणे शहराचा कचरा प्रकल्प हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथे उभारण्यास राज्य सरकारने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उरुळी देवाची येथून हलवण्यात येणारा पुणे शहराचा कचरा प्रकल्प हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथे उभारण्यास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. वन विभागाची असणारी १९.९० हेक्टर जागा पुणे महापालिकेच्या कचऱ्यावरील वैज्ञानिक प्रक्रिया करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट निर्णयाची माहिती दिली आहे. परंतु पिंपरी सांडस येथे कचरा प्रकल्प उभारण्यास येथील स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे.
गेले काही दिवस शहराचा कचरा प्रश्न चिघळला आहे. उरुळी देवाची-फुरसुंगी येथील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तब्बल २२ दिवस
आंदोलन पुकारले होते. त्या वेळी शहरातील कचराप्रश्नाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कचरा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा व्यवस्थापनाचा विस्तृत आराखडा तयार करून नुकताच महापौरांना सादर केला होता.
आराखड्यावर लोकप्रतिनिधी, नागरिकांची आणि स्वयंसेवी संस्थांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यावर काम सुरू होणार आहेच; पण त्याआधी पिंपरी सांडस येथील जागेलाही मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरात दररोज १६०० टन
कचरा निर्माण होत असून त्यापैकी केवळ १००० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पमुळे संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य
होणार आहे.
पुण्याचा कचराप्रश्न मार्गी लागणार ?
पुण्याचा कचराप्रश्न मार्गी लावण्याच्यानिमित्ताने भाजपा आणि शिवसेना यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पिंपरी सांड्स येथे कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या खासदारांनी बोलून दाखवली. महापालिकेपासून ते केंद्र सरकारपर्यंत या प्रकल्पासाठी प्रयत्न केले तरी नियोजित प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार आढळराव पाटील यांनी केला आहे.
पुणे महापलिकेच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. त्यामुळे उरुळी- फुरसुंगीसारखी स्थानिकांच्या विरोधाची परिस्थिती इथेही उद्भवू शकणार आहे.
सत्तेत भागीदार असणाऱ्या शिवसेनेच्या खासदाराचा विरोध डावलून भाजपाने या जागेला परवानगी दिल्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगण्यात येत आहे.