पुण्यातील पीएमपीचा उत्पन्न मिळवण्यासाठीचा नवा मार्ग, बसमधून सुरु होणार कुरिअर आणि मालवाहतुक सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:05 PM2021-05-27T17:05:32+5:302021-05-27T17:25:32+5:30
सेवेसाठी पीएमपी जवळ असणाऱ्या २२०० बसेसचा वापर
पुणे: पुण्यातील पीएमपी बसने उत्पन्न मिळ्वण्यासाठी नव्या मार्गाचा अवलंब केला आहे. आता बसमधून कुरिअर आणि मालवाहतूक सेवा सुरु होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागांत ही सेवा सुरु झाल्याने मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पीएमपीची आर्थिक तडजोड कमी होणार आहे.
पीएमपी जवळ असणाऱ्या २२०० बसेसचा वापर या सेवेसाठी होईल. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची १३ आगार आहेत. तसेच प्रमुख ४० बस स्थानके आहेत. त्या ठिकाणी बसमधून करिअर किंवा मालवाहतूक करता येईल, अशी संकल्पना असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.
सेवेसाठी एक एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. तिच्या माध्यमातून कुरिअर किंवा मालवाहतूक दिलेल्या पत्त्यावर करण्यात येईल. तसेच काही आगारांतून दुसऱ्या आगारांत कुरिअर अथवा माल पोचल्यावर नागरिकांना तेथूनही तो घेता येऊ शकेल. नागरिकांना वस्तू घरपोच हव्या असतील. तर संबंधित एजन्सीच्या माध्यमातून त्या पोहोचवण्यात येतील. कुरिअर किंवा मालवाहतूक कंपन्यांच्या तुलनेत पीएमपीचे दर किफायतशीर असतील, असेही त्यांनी सांगितले.
एजन्सीला १३ आगारांत आणि प्रमुख स्थानकांवर सहकार्य करण्याची पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. तसेच चालक, वाहक यांना या बाबत प्रशिक्षणही दिले जाईल. असे पीएमपीच्या बसमध्ये काही बदल होणार आहेत. पीएमपीच्या कार्यशाळा चालू असताना ते बदल होऊ शकतील. पीएमपीच्या संचालक मंडळानेही या सेवेला मंजुरी दिली असल्याने आता एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया अल्पावधीत सुरू करण्यात येईल. असेही जगताप यांनी स्पष्ट केले.